Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

लालबागचा राजाच्या मंडपात व्हीव्हीआयपींसाठी केल्या जाणाऱ्या स्वतंत्र रांगेच्या मुद्यावर मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. खास पाहुण्यांसाठी ही खास व्यवस्था करून इथं सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत असल्याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आलीय. त्याची गंभीर दखल घेत आयोगानं राज्य सरकारकडून उत्तर मागितलंय.

मानवाधिकार आयोगाचे काय आहेत नेमके निर्देश – मुंबईतील दोन वकील आशिष राय आणि पंकजकुमार मिश्रा यांनी लालबागचा राजाच्या व्हीआयपी दर्शनाबाबत मनावाधिकार आयोगाकडे तक्रार दिलीय. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अनंत बदर यांच्यासमोर सोमवारी या तक्रारीवर सुनावणी झाली. यात आयागोनं राज्याच्या मुख्य सचिवांसह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनाही नोटीस बजावलीय. या तक्रारीची शहानिशा करून सहा आठवड्यात आपलं उत्तर सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगानं या सर्व प्रतिवादींना दिलेत. यावरील प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय. याशिवाय लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांनाही आयोगानं नोटीस जारी करत याप्रकरणी त्यांच्याकडूनही या तक्रारीवर खुलासा मागवलाय.

काय आहे प्रकरण – गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असल्यानं इथं देवाचं दर्शन सर्वांसाठी सुलभ असायला हवं. इथं भक्तांच्या दर्शन व्यवस्थेतील भेदभाव टाळून सामान्य भक्तांना न्याय द्यावा, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आलीय. गणेशोत्सवाच्या काळात इथं इतर मंडळांच्या तुलनेत भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग असते. राजाच्या दर्शनासाठी तासनं तास भाविक रांगेत उभे राहतात. जणूकाही इथं लालाबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये जणू चढाओढच लागलीय. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, लालबागचा राजा गणेश मंडळानं खास भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनरांग करून भक्तांमध्ये खुलेआम भेदभाव केलाय. एकीकडे जिथं सर्वसामान्यांना तासन तास रांगेत उभंनही राहूनही नीट दर्शन घेतलं दिल जात नाही, तिथं व्हीव्हीआयपींना आरामात त्यांच्या सोयीनं दर्शन दिलं जातं. सोशल मीडियावर या दर्शनरांगेतील हाणामाऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत.

चेंगराचेंगरीचा धोका – लालबागचा राजा दर्शनासाठी अगदी निमुळत्या जागेतून सर्वसामान्य भक्तांना जावं लागते. सलग 10 दिवस 24 तास इथं भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असते. मात्र, या गर्दीचं योग्य नियोजन नसल्यानं इथं चेंगराचेंगरी होण्याची भीती असते, असा आरोपही या तक्रारीतून करण्यात आलाय. मंडळाचे कार्यकर्ते आणि इथले खासगी सुरक्षारक्षकांचे भाविकांमधील महिला, दिव्यांग यांच्याबरोबर अनेकदा वादविवादाचे अनेक प्रसंग घडलेत. त्यामुळे इथं मानवाधिकारांचं सरळसरळ उल्लंघन होतंय, असा दावाही तक्रारीतून करण्यात आलाय. त्यामुळे लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची काळजी घेण्याकरता इथं प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात करावेत. जेणेकरून हे वादविवाद टाळता येतील, असा दावा करण्यात आलाय.

    यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतरत्न सचिन तेंडुलकर आदींनी व्हीआयपी दर्शन घेतलं आहे. यंदा 1 कोटीहून अधिक भक्त दर्शनासाठी येतील असा अंदाज असल्यानं दक्षता घेण्याकरिता मुंबई पोलिसांनी 272 हाय-टेक ‘एआय’ कॅमेरे बसवलेत.

    अभिनेता अनुपम खेर यांनी लालबागच्या राजाचं कोणत्याही व्हीआयपी पासशिवाय दर्शन घेतल्याचा दावा केला. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, भक्तांचे प्रेम आणि आयोजकांची दया कायम राहिली ही वेगळी गोष्ट आहे. लाखो लोक येत असताना अद्भुत शिस्त आणि व्यवस्था पाहून मला अभिमान वाटतो. गणपतीबद्दल भक्तांच्या भावना अतूट आहेत. गणपती बाप्पा मोरया!