मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दिल्लीतील भाजपाचा एक मोठा गट सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करताना, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून, मंत्रिमंडळातील काही नेते राजकीय स्वार्थासाठी आंदोलनांचा वापर करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच संजय राऊत यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतले.
अमित शाहांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही : मुंबईत मंगळवारी (2 सप्टेंबर) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ”फडणवीसांनी शिवसेना फोडून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. दिल्लीतील भाजपाच्या एका मोठ्या गटानं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठिंब्यानं, फडणवीस यांच्याविरोधात राजकीय डावपेच आखले आहेत. फडणवीसांनी आपल्या घरात आग लावली आहे. तसंच अमित शाहांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही,” असंही ते म्हणाले.
मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का? : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ”न्यायालयाच्या चौकटीत राहून आंदोलन करणं योग्य आहे, असं न्यायालयाचं मत आहे. पण मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का? घुसखोर आहेत का? न्यायप्रक्रियेत काही विशिष्ट प्रवृत्तीचे लोक सामील आहेत, ज्यात भाजपाचे प्रवक्तेही आहेत,” असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, ”आझाद मैदानावर पावसामुळं चिखल असल्यानं ब्रेबॉर्न स्टेडियम आंदोलकांना उपलब्ध करून देता आले असते. दारूपेक्षा वेगळा कार्यक्रम तिथं होत नाही, त्या क्लबमध्ये मराठा आंदोलकांना जागा द्यायला हवी होती,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह…
संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतले. ”उच्च न्यायालयाला भान आहे का? आज न्यायव्यवस्था कोलमडली आहे,” असा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांना सोबत घेण्याची सूचना राऊतांनी केली. तसंच, रस्ते मोकळे करण्याचे न्यायालयाचे आदेश आणि नवीन न्यायसंहितेचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
संजय राऊत यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवरही टीका केली. ”कुठे आहेत मराठा समाजाचे नेते? उदयनराजे कुठे आहेत?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच, छगन भुजबळ यांनी भाजपावर दोन समाजांमध्ये भांडणं लावण्याचा आरोप केला होता, याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली.
मंत्रिमंडळात अंतर्गत राजकारण : संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की, ”आंदोलन चिघळावं, गावागावात दंगली उसळाव्यात, यासाठी मंत्रिमंडळातील काही लोक काम करत आहेत. हे न्यायालयाला माहिती नसेल, पण मुख्यमंत्र्यांना नक्कीच माहिती आहे. राज्यात अस्थिरता निर्माण करून मुख्यमंत्री बदलण्याचा डाव मंत्रिमंडळातील काही शक्ती आखत आहेत,” असा दावाही त्यांनी केला.
