मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईमधील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे त्यांचा मराठा आंदोलनाला विरोध असून त्यांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुधोरी राजे भोसलेंनी एक पत्रकच जारी केलं आहे.
वेगळी भूमिका घेताना काय म्हटलं?
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत; मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो, असेही मुधोजी राजे भोसलेंनी आपली वेगळी भूमिका मांडताना यापूर्वी म्हटले होते. मात्र यावरुन त्यांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध असून ओबीसी आंदोलनाला पाठिंबा असल्याची चर्चा सुरु झाली. यावर आता स्वत: मुधोजी राजे भोसलेंनी स्पष्टीकरण दिलंय.
स्पष्टीकरणात काय म्हटलं?
”मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन सुरू आहे. यात महाराष्ट्रातील लाखों मराठा सहभागी झाले आणि होत आहेत. या आंदोलनाच्या संदर्भात माध्यमांनी माझी भूमिका जाणून घेतली. त्यावर मी भूमिका जाहीर केली की, कोणाच्या अधिकारातून आरक्षण नको. ”मराठा समाजाला शिक्षणासाठी व नोकरीसाठी मराठा म्हणून हक्काचं आरक्षण मिळावे. जेणेकरून ते टिकेल.” मी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन शुभेच्छाही दिल्या आहेत,” असं मुधोजी राजे भोसलेंनी स्पष्ट केलं आहे.
मराठा समाजाच्या भावना दुखवल्या
पुढे आपल्या पत्रकामध्ये मुधोजी राजे भोसलेंनी, ”परंतु माध्यमातील काही माध्यमांनी बातमी चालवली की मी जरांगेनां फटकारलं, मराठा आंदोलनाला विरोध केला, ओबीसी आंदोलनाला मी पाठींबा दिला. हे अत्यंत चुकीचं आहे. मी मराठा आंदोलनाचा कुठेचं विरोध केला नाही व ओबीसी आंदोलनाला पाठींबाही दिलेला नाही. या माध्यमातून माझी माध्यमानां विनंती आहे की, चुकीची बातमी चालवू नका. या चुकीच्या बातमीमुळे मराठा समाजाच्या भावना दुखवल्या जात आहे. समाजात गैरसमज निर्माण होत आहे. मराठा समाजाच्या भावनाचा कृपया आदर करा. या चुकीच्या बातम्यामुळे समाजाच्या भावना दुखवल्या आसतील तर मी दिलगीरी ही व्यक्त करतो,” असं म्हटलं आहे.
आपल्या पत्राच्या शेवटी मुधोजी राजे भोसलेंनी, ”एक मराठा लाख मराठा!” असा उल्लेख आवर्जून केला आहे.
