मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने दक्षिण मुंबईमध्ये सुरु असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान तिला आलेल्या अनुभवासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आपल्या गाडीला चाहू बाजूंनी घेरलं आणि हुल्लडबाजी केल्याचा आरोप सुमोना चक्रवर्तीने केला आहे. दक्षिण मुंबईत राहून पहिल्यांदाच आपल्याला या शहरात राहत असल्याची भिती वाटली असं म्हणताना हा सारा प्रकार म्हणजे कायदा सुव्यवस्थेची खिल्ली उडवण्यासारखा असल्याचं सुमोना चक्रवर्तीने नमूद केलं आहे. मात्र तिने तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्यावरच टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्यावरील टीकेदरम्यान अचानक पश्चिम बंगालचा लोकांकडून वारंवार उल्लेख होताना दिसतोय.
सुमोना चक्रवर्तीने नेमकं काय म्हटलंय?
सुमोना चक्रवर्तीने 31 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ज्या ठिकाणी मराठा आंदोलन सुरु आहे त्या दक्षिण मुंबईमधून प्रवास करताना आलेल्या अनुभवाचा उल्लेख पोस्टमध्ये केलाय. सुमोना चक्रवर्तीने नक्की काय म्हटलंय ते आधी जाणून घेऊयात. सुमोना चक्रवर्तीचं म्हणणं काय आहे पाहूयात तिची पोस्ट जशीच्या तशी….
आज दुपारी 12:30 वाजता मी कुलाबा ते फोर्ट मार्गावरुन जात असताना अचानक माझ्या गाडीचा रस्ता एका जमावाने अडवला. गळ्यात भगवं वस्र असलेल्या माणसाने माझ्या गाडीच्या बोनेटवर हात आपटला. त्याचे मित्र माझ्या गाडीच्या खिडक्यांवर हात आपटत ‘जय महाराष्ट्र!’च्या घोषणा देत हसत होते. पाच मिनिटांत दोनदा हीच घटना घडली. तिथे कोणताही पोलीस नव्हता (नंतर दिसलेले पोलीस फक्त बसून गप्पा मारत होते.)
मी जवळपास आयुष्यभर मुंबईत आणि विशेषत: दक्षिण मुंबईत राहिले आहे. या कालावधीमध्ये मला कधीच असुरक्षित वाटले नव्हते. पण आज अनेक वर्षांत पहिल्यांदाच भरदिवसा माझ्या स्वत:च्या गाडीत असताना मला खरंच असुरक्षित वाटले. माझ्यासोबत एक मित्र होता, ही एकमेव दिलासादायक गोष्ट होती. जर मी एकटी असती तर काय झाले असते, हा विचार माझ्या मनात आला तरी अंगाचा थरकाप उडतो. मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा विचार केला;पण त्यामुळे ते आणखी चिथावले जातील, असे वाटल्याने मी व्हिडीओ शूट करणं टाळलं. तुम्ही कोणीही असा किंवा कुठेही असा कायदा आणि सुव्यवस्था कोणत्याही क्षणी कोलमडू शकते, हे समजल्यावर खूप भीती वाटते.
कायद्याच्या व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं दिसून आलं. शांततापूर्ण आंदोलनेही अस्तित्वात आहेत. आम्ही यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या कारणांसाठी अशी आंदोलने पाहिली आहेत. तरीही पोलीस अशा आंदोलनांवर कारवाई करतात. पण इथे? हा बेकायदेशीरपणाचा कळस झाला आहे. एक कर भरणारी नागरिक, एक महिला आणि या शहरावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला या प्रकारामुळे खूप त्रास झाला आहे. आम्हाला या प्रशासकीय आणि नागरिक जबाबदाऱ्यांचा ज्या पद्धतीने उपहास सुरु आहे त्यापेक्षा नक्कीच चांगले जीवन मिळण्याचा अधिकार आहे.
ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था वाटत नाही. हा प्रगतीशील समाज वाटत नाही. ते ज्या डिजिटल भारताबद्दल बोलत राहतात तो हा नाही. कारण जेव्हा जातीयवाद, धर्म, राजकारण, भ्रष्टाचार, नोकरशाही, निरक्षरता आणि बेरोजगारी हे नाटक चालू असते – तेव्हा तो विकास असत नाही. हा विनाशाकडे जाण्याचा मार्ग आहे.
अनेकांची सुमोनावरच टीका
सुमोना चक्रवर्तीने अगदी उघडपणे आपला आक्षेप नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्यावरच टीका केल्याचा पाहायला मिळत आहे. सुमोना चक्रवर्तीने मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केल्यावरुन अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी आपला संताप व्यक्त करताना सुमोना चक्रवर्तीला तिच्या मूळ राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये निघून जाण्याचा सल्ला दिला आहे. ”बिहारी उरावर येऊन बसतात तेव्हा चांगलं वाटतंय आम्ही आलो तर तुझं दुखायलाल लागलय आता,” असं अभय नावाच्या तरुणाने म्हटलं आहे. तर, ”शांत हो! तू मराठ्यांच्या भूमीत आहेस. हे पश्चिम बंगालपेक्षा फार सुरक्षित आहे,” असं प्रणव देशपांडे या तरुणाने म्हटलंय. प्रमोद नावाच्या तरुणाने सुमोनाला, ”बंगाली पळून जा, बंगालमध्ये परत जा,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
चिंता व्यक्त करण्याऐवजी लोक…
रियंका बॅनर्जी नावाच्या तरुणीने, ”या विषयाबद्दल चिंता व्यक्त करण्यापेक्षा आणि त्यावर सामधान शोधण्याऐवजी लोक पश्चिम बंगालबद्दल विधानं करत तिला पुन्हा पश्चिम बंगालमध्ये जाण्यास सांगत आहेत. हे अत्यंत भयानक आहे. हा देश कोणाच्या बापाचा नाही. हा देश आपल्या सर्वांचा आहे,” असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
गुजराती तरुणाचा मराठ्यांना पाठिंबा
राज सोनी नावाच्या तरुणाने, ”मी गुजराती आहे. ही लोक वाईट नाहीत. ते आपला हक्क मागण्यासाठी मुंबईत आले आहेत. ते 100 टक्के महिलांचा सन्मान करतात. कसेही दिसत असले तरी मनाने राजा माणसं आहेत ही. मी मराठा समाजाला सलाम करतो. मी लहानपणापासून यांच्यामध्येच वाढलो आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात ‘दिल्लीत’ नाही,” असं म्हणत सुमोनाला शांत होण्याचा सल्ला दिलाय. महेश लांबे यांनी, ‘मुंबईतून निघून जा’ असं म्हटलंय तर हार्दिक राणेने, ”तू किती सभ्य आहेस हे साऱ्या जगाने बघितले जेव्हा तू सिगरेट फुकत होती,” असं म्हटलं आहे. अविनाश पाटीलने, ”सोडून जा बाई मुंबई,” असा सल्ला सुमोनाला दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये तुला कुत्रंपण विचारणार नाही
प्रणित लांडगेने या पोस्टवर मोठी कमेंट करत, ”पश्चिम बंगालमध्ये काय चालतंय ते साऱ्या जगाला माहिती आहे. सुमोन चक्रवर्ती तुला नसेल जमत तर जाऊ शकतेस तिकडे. पण तिकडे तर तुला कोणी कुत्रंपण नाही विचारणार. तेव्हा खूप शहाणपणा नको दाखवू. त्या कपिल शर्माचा शो सोडला तर तुला दुसरं काही काम नाही, तिथे पण तू तुझ्या इभ्रतीचा भाजीपाला करूनच टिकली आहेस आणि त्याच पैशांचा माज दाखवत आज पोस्ट केली आहेस,” असं म्हटलंय.
दिसण्यावरुनही लोकांच्या प्रतिक्रिया
अनेकांनी सुमोनाबद्दल वादग्रस्त कमेंट्सही केल्या आहेत. ”बदकाच्या तोंडाची” अशी कमेंट हितेश सुर्वेने केली आहे. तर राहुल जाधव यांनी, ”बाई तुम्हाला बघून आम्हालाच असुरक्षित वाटायला लागलंय,” असं म्हटलं आहे.
दरम्यान, आज मुंबईकर गणपतीच्या सुट्टीनंतर कामावर परतत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ आंदोलन सुरु असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
