मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजानं आंदोलनाची हाक दिली आणि या आंदोलनाचा चौथा दिवस उजाडला तरीही परिस्थिती मात्र सुधारल्याचं पाहायला मिळालं नाही. उलटपक्षी मोठ्या संख्येनं मुंबईत मराठा आंदोलकांचं येण्याचं सत्र सुरूच असल्या कारणानं स्थानिक मुंबईकरांसह शहरात नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तिथं मराठा आंदोलकांकडून आपल्या खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याचा आक्रोश केल्याचं पाहता काही नेत्यांनी या आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये राज ठाकरे यांचा मनसे पक्षसुद्धा मागे राहिला नाही. राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना अन्नपाण्याची आणि वैद्यकिय सुविधेची मदत करण्याचं आवाहन मनसैनिकांना केलं आहे.
ते आपलेच आहेत… लढाई आरक्षणासाठी असली तरीही…
‘लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे’, असं त्यांनी सोशल मीडियावर एका अधिकृत पत्रकातून स्पष्ट केलं.
घरादारापासून दूर आलेल्या या आंदोलकांप्रती सहानुभूतीची भावना दाखवत त्यांच्यासाठी अमित ठाकरे आणि मनसेनं मदतीचा हात पुढे केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल’, असं म्हणत आलेले आंदोलक हे शेतकरी, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेतष्ठ म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत, अशा शब्दांत त्यांनी या आंदोलकांप्रती सहानुभूती दाखवली.
