पुणे / महान कार्य वृत्तसेवा
चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण मुद्द्यावरून होणाऱ्या आंदोलनाका गंभीर वळण मिळालं असून, आंदोलकांनी काही ठिकाणी आक्रमक भूमिका घेत दक्षिण मुंबईत रेल्वे स्थानकं, रस्त्यांवर ठिय्या मांडल्यानंतर शासनानं आरक्षणासंदर्भातील तोडगा काढण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. तर, तिथं मराठा कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि ओबीसी लक्ष्मण हाके यांची मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका पाहता त्यांच्या निषेधार्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांच्यासाठी रोगरची बाटली घेऊन मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातून मुंबईच्या दिशेनं असलेल्या मराठा बांधवांसाठी जेवणाचा शिधा घेऊन जात असताना मराठा बांधवाकडून सदावर्ते आणि हाकेंसाठी काळजी घेण्याचा (उपरोधिक) प्रयत्न करण्यात आला आहे.
सदावर्ते यांची दृष्टी खराब झाली असून त्याचे डोळे दुरुस्तीसाठी त्यांना रोगरची बाटली घेऊन मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाल्याचं मराठा कार्यकर्त्यांनी सांगितलं. रोगाच्या बाटलीतील औषध घेतल्यानंतर मराठ्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल आणि हाकेंच्या मनामध्ये विकृती निर्माण झालीय त्यांनीसुद्धा या रोगरचे दोन तीन घोट घ्यावेत म्हणजे त्यांच्या मनातील बुद्धीत परिवर्तन होईल, असं मराठा आंदोलक म्हणताना दिसले.
विषानेच विष उतरविले जाते म्हणून…
विषानेच विष उतरविले जाते म्हणून सदावर्ते आणि हाके यांनी रोगर घ्यावे आणि मराठ्यांविषयी मनातील विष बाहेर निघावे अशी प्रतिक्रियाता मराठा आंदोलकांनी दिली. दरम्यान सध्या मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांचा आकडा वाढताना दिसत असून, त्यामुळं शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शहरातील पोलीस यंत्रणांवरही या परिस्थितीमुळं अतिरिक्त ताण येताना दिसत आहे. तेव्हा आरक्षणावरून पेटलेल्या या वादावर शासन लवकरात लवकर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोगर म्हणजे नेमकं काय?
रोगर हे एक कीटकनाशक असून हे संपर्क आणि प्रणालीगत ऑर्गनोफॉस्फेट कीटकनाशक आहे जे इतर कीटकनाशकांसोबत वापरले जाते. विविध पिकांवरील कीटकांच्या विस्तृत श्रेणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरतं.
