Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
चीनमधील तियानजिन येथे जगातील तीन शक्तीशाली देशांचे अध्यक्षांची भेट झाली. त्यामुळं या भेटीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये या तीन ताकदवान नेत्यांच्या भेटीनं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. हे तीन नेते एकत्र आल्यानंतर अमेरिकेची झोप उडण्याची शक्यता आहे.
मोदी – पुतिन – जिनपिंग भेट : सोमवारी सकाळी चीनमधील तियानजिन येथे नवीन जागतिक व्यवस्थेतील तीन दिग्गजांची भेट झाली. आज सकाळी एससीओ बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, यजमान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट झाली. तिन्ही नेत्यांच्या भेटीचे हे फोटो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवण्याची शक्यता आहे.
तीन नेत्यांमध्ये हलक्याफुलक्या वातावरणात चर्चा : सोमवारी सकाळी तियानजिनमध्ये महासत्तांची एक भव्य बैठक पाहायला मिळाली. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन पंतप्रधान मोदींभोवती उभे आहेत. यादरम्यान, पंतप्रधान मोदी मध्यभागी आहेत. तिन्ही राष्ट्रप्रमुख त्यांच्या अनुवादकासोबत हलक्याफुलक्या वातावरणात बोलत आहेत.
विचारांची देवाणघेवाण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, ”तियानजिन चर्चा सुरूच आहे! एससीओ शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी विचारांची देवाणघेवाण.”
टॅरिफ धोरणाविरोधात रोष : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 20 हून अधिक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत जागतिक व्यवस्थेतील ”गुंडगिरी” वर्तनावर कडक टीका केली. हा रोष थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात असल्याचं दिसून आलं.