Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी समर्थकांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरुन सरकारला इशारा दिला आहे. याचबरोबरच आर्थिक व्यवहार होत असून यामुळे आपलं नाव खराब होत असल्याबद्दल जरांगेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

आर्थिक व्यवहारांवरुन संतापले

आपल्या समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये जरांगेंनी आंदोलनाच्या नावाखाली पैशांची देवाण-घेवाण होत असून यामुळे माझं नाव खराब होत असल्याचंही जरांगेंनी संतापून म्हटलं आहे. ”पैसे गोळा करण्यासाठी काहीजण काम करत आहेत. हे असं कोण करतंय मला माहिती आहे. मी नाव पण घेऊ शकतो. तुमच्या अशा नालायकपणामुळे माझं नाव खराब होतं. मी महाराष्ट्रातील मराठा समजला सांगतो, कोणालाही पैसे देऊ नका. तुम्हाला काय सेवा करायची आहे ती तुम्ही करू शकता पण पैसे द्यायचे नाही,” असं जरांगेंनी मदतीचा हात पुढे करणाऱ्यांना म्हणाले.

उद्यापासून मी…; जरांगे आंदोलन अधिक तीव्र करणार

पुढे बोलताना जरांगेंनी आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं सांगितलं. सरकारला दोन वर्ष दिल्यानंतरही काहीही हलचाली झाल्याचं दिसलं नाही असं नमूद करतानाच जरांगेंनी, ”उद्यापासून मी पाणी देखील पिणार नाही. उद्यापासून कडक उपोषण करणार, सरकार काही मागण्या ऐकत नाही. अंबालबजावणी करत नाहीये,” असं म्हणत निजर्ळ उपोषण करणार असल्याचं समर्थकांना सांगितलं. तसेच, ”काहीही झाले तरी आरक्षण घेणार तेही ओबीसीमधूनच घेणार,” असं जरांगेंनी समर्थकांना दिलेल्या भाषणामध्ये ठणकावून सांगितलं.

नितेश राणेंचा चिचुंदरी असा उल्लेख

नितेश राणेंवर निशाणा साधताना जरांगे यांनी त्यांचं उल्लेख चिचुंदरी असा केला. ”चिचुंदरी काय बोलते तेही कळत नाही,” असा टोला जरांगेंनी लगावला. ”नितेश राणे यांच्याकडे आंदोलन संपले की बघतोच,” असंही जरांगे म्हणाले.

वाशी-शिवडीला गाड्या लावा

”आपापल्या गाड्या वाशी-शिवडी या भागात लागा. आझाद मैदानाच्या परिसरातून गाड्या काढा,” असं आवाहन जरांगेंनी समर्थकांना केलं. ”तुम्ही लांब गाडी लावल्या की तुम्हाला ट्रेननेने प्रवास करता येईल,” असंही जरांगेंनी समर्थकांना सांगितलं.