मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील 19 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रीय असलेल्या प्रियाची अशी अकाली एक्झिट चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. प्रियाच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या शेवटच्या पोस्टवर आता चाहते तिला श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. प्रियाची शेवटी पोस्ट नेमकी काय होती? त्यात तिने काय लिहिलेलं जाणून घेऊयात…
कशामुळे झालं निधन?
मागील वर्षभराहून अधिक काळापासून प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली. पहाटे चार वाजता प्रियाचं मीरा रोड येथे निधन झालं. ‘पवित्र रिश्ता’मधून प्रिया ही देशभरामध्ये हिंदी भाषिकांच्या घरोघरी ओळखीचा चेहरा झाली होती. अनेक मालिकांमधून प्रियाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रिया मराठेचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झालेला.
प्रियाने काम केलेल्या मालिका आणि चित्रपट
2006 साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून ती वेळोवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘कॉमेडी सर्कस’ इत्यादी मालिकांमध्ये प्रियाने आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याच प्रियाने मराठी चित्रपटसृष्टीमध्येही काम केलं.2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘विघ्नहर्ता महागणपती’ चित्रपटात प्रिया झळकली होती. तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती सोशल मीडियावरही अनेक फोटोशूट तसेच भटकंतीचे मजेदार फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची.
प्रियाची शेवटची पोस्ट
प्रिया ही कर्करोगाचं निदान होईपर्यंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती अनेकदा आपल्या फोटोशूटमधील आणि भटकंतीचे फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट करायची. मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून प्रिया सोशल मीडियापासून दूर होती. प्रियाची तिच्या इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट ही 11 नोव्हेंबर 2023 ची आहे. या पोस्टमध्ये प्रियाने तिचं साड्यांसंदर्भातील प्रेम व्यक्त केलं आहे. ”साडी आणि मी!” अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे. या पोस्टमध्ये प्रिया तिच्या आवडत्या साड्या परिधान केल्याचं दिसून येत आहे. हा एक कोलाज केलेला व्हिडीओ आहे.
आता याच व्हिडीओवर चाहते प्रियाला श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेत्यासोबत विवाह
प्रिया मराठेने श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघेसोबत 24 एप्रिल 2012 रोजी लग्न केलं होतं. शंतनू स्वत: एक अभिनेता आहे. प्रियाच्या मागे पती आणि आई असा परिवार आहे.
