मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठे हिचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या 38 व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली. प्रिया गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंजत होती. मात्र अखेर तिचा लढा अपयशी ठरला. प्रियाच्या मृत्यूनंतर सिनेविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रियाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सुबोध भावे यांनेही सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच, प्रिया माझी चुलत बहिण होती, असंदेखील त्याने म्हटलं आहे.
सुबोध भावे याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने प्रियासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. सुबोधनं लिहिलं आहे की, ”’प्रिया मराठे” एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. ”तू भेटशी नव्याने” या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला.
पुढे त्याने म्हटलं आहे की, ‘या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. ओम शांती. ‘
दरम्यान, सुबोधच्या या पोस्टवर अनेक कलाकारदेखील व्यक्त झाले आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर हिने म्हटलं आहे की, काही मजेशीर दिवस आपण तिघांनी एकत्र अनुभवले आहेत. ती गेली… आठवणी तशाच आहेत. अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी लिहिले की, ‘फार कमी गोष्टींनी मला इतकं अस्वस्थ वाटतं. त्यातली ही एक. प्रिया.’
रविवारी सकाळी चार वाजता मीरा रोड येथे प्रिया मराठेची प्राणज्योत मालवली. एवढ्या कमी वयात अभिनेत्रीची अशी अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे. आज दुपारी 4 नंतर मीरा रोड येथे प्रियावर अत्यंसंस्कार होणार आहेत.
