पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) बस सेवेचा लाखो पुणेकर आणि पर्यटक लाभ घेतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. याच महिला प्रवाशांसाठी पीएमपीच्यावतीने रक्षाबंधन सणानिमित्त एक विशेष ‘लकी ड्रा’ योजना आयोजित करण्यात आली होती. या योजनेची सोडत शुक्रवारी (29 ऑगस्ट) जाहीर झाली. या लकी ड्रॉमध्ये 17 महिला प्रवाशांची निवड झाली आहे. विजेत्या महिला प्रवाशांना पैठणी साडी आणि एक महिन्याचा मोफत बस पास दिला जाणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
क्लस्टर प्रोग्रॅमिंगच्या प्रमुख स्मिता रणदिवे यांच्या हस्ते संगणकीय पद्धतीने ‘लकी ड्रॉ’ची सोडत काढण्यात आली. या कार्यक्रमाला पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरणाची तारीख आणि वेळ विजेत्या महिलांना फोनच्या माध्यमातून कळवली जाईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्टला रक्षाबंधनानिमित्त ही योजना सुरू केली होती. तिला महिला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पीएमपीएमएल पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगरे आणि पीएमआरडीए परिसरात बस सेवा चालवते. या सेवेचा दररोज 11 ते 12 लाख प्रवासी लाभ घेतात. त्यात सुमारे 4-4.5 लाख महिलांचा समावेश आहे. महिलांसाठी सुरक्षित, परवडणारा आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय म्हणून पीएमपी बस सेवेकडे बघितलं जातं.
पूजा वैद्य, ऋतुजा संजय सावंत, तय्यबा अब्दुल शेख, मीना सोमनाथ बोदरे, प्रेरणा दिनकर पवार, राधा कांबळे, तन्वी शिंदे, ज्योती दीपक कदम, रेखा यरमवाड, तनिष्का संदीप निकम, शीतल अजय माचुत्रे, माया बर्वे, रंजना अविनाश कांबळे, कविता चव्हाण, पौर्णिमा भोसले, सुनीता मुरंबे, अंजली संजय गोणारकर.
