मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
कालपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण घेऊनच मुंबई सोडेन, असं म्हणत जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. अशातच आता मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता आझाद मैदानावर देखील आंदोलकांचे हाल झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता आझाद मैदानावर झालेल्या गैरसोईबद्दल जरांगे पाटील चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं.
आझाद मैदानावर इथं महानगरपालिकेच्या लायटिंग नाहीये का? काय भिकारचाळे रे तुमचे? 50-60 वर्ष तुम्ही सत्ता भोगल्या. स्वत:चे घरं भरून बसले. सरकार कुठंय? असा सवाल करताना जरांगे यांनी थकलेल्या आवाजात पोरांना आदेश दिला. पोरांनो 10-15 फोकस विकत आणा आणि इथं लावा. जाताना महापालिकेला फुकट फोकस आणून देऊ असं जरांगेंनी म्हणतात आंदोलकांनी एकच जल्लोष केला.
कुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर मी आंदोलन सोडून देईल, असं म्हणत जरांगे यांनी आंदोलकांना तंबी दिली. यावेळी जरांगे यांनी वाहन पार्किंगच्या जागेची नावं देखील वाचून दाखवली. त्यानंतर त्यांनी गणरायाची आरती केली. त्यावेळी जरांगेंना जास्त वेळ उभं रहावलं नाही. तर हात देखील थरथर कापत असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मराठा आंदोलनात सुरक्षेसाठी चार सुरक्षा पथक तैनात, मुंबई पोलीस, सीआयएसएफचे जवान, धडक कृती दलाचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
