मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन आणि दोषमुक्ती अर्जांवरील पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवरील निकाल राखून ठेवण्यात आला, तर काही आरोपींच्या अर्जांवर मूळ फिर्यादीचे म्हणणे न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी वाल्मीक कराडला जामीन मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. आज दिवसभरात यावर निकाल येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, विष्णू चाटे यांच्या दोषमुक्ती अर्जावरील निकालही राखून ठेवण्यात आला आहे.
इतर आरोपी, ज्यांची संख्या 2 ते 7 आहे, यांनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज केले आहेत. या अर्जांवर मूळ फिर्यादीने आपले म्हणणे सादर न केल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अनुपस्थित होते. पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी उर्वरित आरोपींच्या अर्जांवर तसेच राखून ठेवलेल्या निकालांवर निर्णय येण्याची शक्यता आहे.
