पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
शिये, ता.करवीर येथील भाड्याने राहणाऱ्या महिलेसोबत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवून तसेच जादूटोणा ची भीती घालून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिडीत महिला २०१९ पासून शिरोली एमआयडीसी येथे कामानिमित्त आल्या असता शिये, रामनगर येथे गैबीसाब लेंगरे यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होत्या. यादरम्यान बेबीजान व गैबीसाब यांनी संगनमत करून पिडीत महिलेशी जवळीक वाढविली. गैबीसाबने पहिले लग्न झाल्याचे लपवून पिडीत महिला हिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले. परंतु पिडीत महिलेला गैबीसाबचे लग्न झाल्याचे समजताच पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, गैबीसाब व बेबीजान यांनी मांत्रिकाला बोलावून सदर महिलेवर जादूटोणा करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सावंत यांनी शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी जबाब नोंदवून शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बेबीजान दस्तगिर लेंगरे व गैबीसाब दस्तगिर लेंगरे (रा.रामनगर, शिये) यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार व लैंगिक अत्याचार प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
