Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. हजारो मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात गर्दी केल्यानं शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पावसामुळं आंदोलकांची गैरसोय वाढली असून, खाण्यापिण्याच्या सुविधा आणि स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळं त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळं आक्रमक झालेल्या आंदोलकांनी शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरली. त्याची गंभीर दखल घेत मनोज जरांगे पाटील यांनी स्वयंसेवक पाठवून वाहतूक कोंडी सोडवण्याचं आवाहन केलं.

आंदोलकांचा रास्ता रोको : आज सकाळी आंदोलक सीएसएमटी परिसरात रस्त्यावर उतरल्याने ईस्टर्न फ्रीवे आणि जे.जे. उड्डाणपूलाजवळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या. मुंबई पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक आणि रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात केली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने स्थानिक नागरिकांना आणि गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळं मुंबई पोलिसांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं.

पावसाचा त्रास, आंदोलकांचे हाल : आझाद मैदानात पावसामुळे चिखल झाला असून, शौचालयांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परिसरातील खाऊगल्ली आणि हॉटेल्स बंद असल्याने आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. काही आंदोलकांनी स्वत:हून जेवण आणले असले, तरी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागली. जरांगे यांनी मुंबई पोलिसांना आझाद मैदानाच्या आसपासची मैदाने तातडीने मोकळी करण्याची मागणी केली, जेणेकरून आंदोलकांना पार्किंग आणि विश्रांतीसाठी जागा मिळेल.

अमित शाह यांनी घेतला आढावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे समाज हिताचे नसल्याचे महटले आहे. मात्र, जरांगे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ”आम्ही इथेच उपोषण करून मेलो तरी मागे हटणार नाही,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मराठा आंदोलनाची माहिती घेतली असून, भाजपा नेते विनोद तावडे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अमित शाह यांच्या भेटीला सह्याद्री अतिथिगृहावर पोहोचले आहेत.