Spread the love

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा

पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका महिलेनं एका तरुणाशी प्रेमसंबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. समाजाच्या भीतीनं तिने घरीच प्रसूती केली आणि नवजात अर्भकाला कचरा कुंडीत फेकलं. मात्र सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाचा जीव वाचला. ही धक्कादायक आणि संताप आणणारी घटना छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून केवळ 8 तासांत पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. पोलीस तपासात असंही उघड झालं आहे की, ती प्रसूती करताना एकटी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

पोत्यामधून बाळाच्या रडण्यासारखा आवाज आला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 29 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. एक युवक बाहेरगावाहून संभाजी नगरात पहाटे 5 वाजता दाखल झाला होता. तो पुंडलिकनगर भागातून जात असताना त्याला एक कुत्रं कचरा कुंडीतील पोतं ओढत असल्याचं दिसलं. तसेच, त्या पोत्यामधून बाळाच्या रडण्यासारखा आवाज येत असल्याचंही त्याच्या लक्षात आलं. त्यानं तत्काळ कुत्र्यांना हाकलून लावत पोतं उघडलं. त्यात नवजात अर्भक दिसून आलं. बाळाच्या छातीत जखम झालेली होती. अशा स्थितीत त्या युवकानं आणि त्यावेळी सकाळी फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने अर्भकाला तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्या माध्यमातून एका महिलेनं अर्भक फेकल्याचं स्पष्ट झालं. तिच्या कपड्यांच्या आणि चप्पलांच्या आधारे 7 ते 8 तासांत पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतलं.

महिलेनं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला : सदर महिला पतीपासून विभक्त असून तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधातून ती गर्भवती राहिली. ही बाब कोणालाही कळू नये म्हणून तिनं घरीच प्रसूती केली. स्वत:च नाळ कापून नवजात अर्भकाला गोणीत टाकून कचरा कुंडीत फेकलं, अशी कबुली तिनं पोलिसांना दिली आहे. घरीच प्रसूती केल्यानं तिची प्रकृती खालावली असून, तिच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

प्रसूतीदरम्यान कोणी होते का? पोलिसांचा तपास सुरू : सदर महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात तिनं एकटीनेच घरी प्रसूती केल्याचं सांगितलं आहे. मात्र, या कथेमध्ये तथ्य नसल्याचा संशय पोलिसांना असून, त्या वेळी घरी आणखी कुणीतरी उपस्थित होतं आणि त्यानं प्रसूतीस मदत केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू असून, त्यादृष्टीने विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.