Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज शनिवारी (30 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात लढा सुरू आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी खेड्यापाड्यातून आलेल्या आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. यावरून जरांगे पाटलांनी राज्य सरकारसोबतच बीएमसी आयुक्तांवरही टीका केली.

वास्तविक, मराठा आंदोलक आंदोलनाच्या पहिल्या दिवशी (29 ऑगस्ट) रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाटांवर झोपले. यानंतर आज सकाळी आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हतं. तसेच मुंबई महानगरपालिकेनं या परिसरातील हॉटेल्स बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळालं.यावरून जरांगे यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना लक्ष्य केलं.

‘देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचाय’ : आझाद मैदानावरून बोलताना मनोज जरांगेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. जरांगे म्हणाले की, ”मराठ्यांना वेठीस धरू नका तुमच्या हातात संधी आहे. संधीचं सोनं करा. तुम्हाला वाटत असेल, हाणेन मारेन पण जर तुम्ही आंदोलकांवर लाठीमार केला तर त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही अडचण होईल. देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आहे.”

बीएमसी आयुक्तांना इशारा : यावेळी जरांगे पाटील यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही इशारा दिला. ते म्हणाले की, ”पोरांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही, आयुक्तसाहेब तुम्ही रिटायर झाले तरी सुट्टी देणार नाही. बीएमसीच्या आयुक्तांचं नाव लिहून ठेवा, दुकानं बंद केले. हॉटेल बंद केले. खायला मिळालं नाही, पोरांचे हाल झालेले आम्ही लक्षात ठेवू”, अशा शब्दात जरांगे पाटलांनी बीएमसी आयुक्तांना लक्ष्य केलं.

मुंबईकरांची गैरसोय : दरम्यान, गावखेड्यातून आलेल्या लाखो आंदोलकांची मात्र, मुंबईत मोठी गैरसोय होत आहे. पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला आहे. तर दुसरीकडे झोपण्याची बसण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची पुरेशी सोय नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले. या आक्रमक आंदोलकांनी शनिवारी सकाळी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पायी जाणाऱ्यांची चौकशी करूनच पुढे जाण्यास परवानगी दिली जात आहे.