मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाताली लाखो बांधवांनी देशाची आर्थिक राजधानी गाठली आणि इथं पोहोचून त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला. याचदरम्यान आंदोलकांनी कैक दिवसांची रसदही सोबत आणल्याचं पाहायला मिळालं. तर, आंदोलकांच्या भुकेच्या काळजीपोटी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारे अनेक हातही पुढे सरसावले. त्यातच लासलगावातील नागरिकांनी विशेष लक्ष वेधलं.
मराठा मोर्चाच्या आरक्षणावरून सुरू असणाऱ्या या उपोषण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना येवला-लासलगाव मतदार संघातील मराठा बांधवांनी पुढाकार घेत भाकरी, चपाती ठेचा असं जेवण आणत त्यांनी आंदोलनस्थळी या जेवणाचं वाटप केल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनासाठी लासलगाव येथील मुस्लिम समाजाचाही पुढाकार पाहायला मिळाला. जिथं, येथील मुस्लिम महिला भगिनींकडून भाकरी तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून आलंय.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जारंगे पाटील उपोषणाला बसले असतानाच राज्यभरातून लाखो मराठा बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. या प्रचंड जनसमुदायाच्या जेवणाची व्यवस्था येवला-लासलगाव मतदारसंघावर सोपवण्यात आली आहे. या व्यवस्थेत मुस्लिम समाजाचाही मोठा पुढाकार दिसून येत आहे. मुस्लिम महिलांनी आंदोलनकर्त्यांसाठी शेकडो भाकऱ्या तयार करून या आंदोलनात खारीचा वाटा उचलला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक यानिमित्ताने लासलगाव इथं दिसलं आणि या भावनेचं, या कृतीचं सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आलं.
आंदोलन सुरूच राहणार? मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं शनिवारीसुद्धा जरांगेंचं आझाद मैदानात सुरू असणारं आंदोलन लांबत असल्याचं स्पष्ट होत आहे. आरक्षण द्या नाहीतर गोळ्या घाला अशी रोखठोक भूमिका मनोज जरागेंनी घेतली असून, त्यांनी मराठा आंदोलकांना जेवण आणि पाणी मिळू न दिल्याचा आरोपही यावेळी केला आहे. दरम्यान आंदोलकांनीसुद्धा आपल्या जेवणाची आबाळ होत असल्या कारणानं मुंबईतील पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
