मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागातून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने आंदोलकांमी मुंबईच्या दिशेने कूच केली होती. मुंबईची वेश समजला जाणाऱ्या वाशी टोल नाक्यावरही आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. तर, काही आंदोलकांनी मुंबईत येणयासाठी अटल सेतूचा आधार घेतला. शुक्रवारी सकाळी अटल सेतूवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालकांना दोन तास एकाच जागेवर अडकून पडावे लागले होते. अटल सेतूवर सुमारे दोन किमीपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या.
फ्री-वेवर अटल सेतूपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसंच पूर्व द्रुतगती महामार्गावर शिवडीजवळ मोठी कोंडी झाली होती. वाहनांची ही कोंडी अटल सेतूपर्यंत पोहोचली होती. अटल सेतूवरील 20 मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना दोन तासांहून अधिक वेळ लागला होता. आंदोलकांसह मुंबईत कामानिमित्त येत असलेल्या वाहनचालकांचचाही त्यातून खोळंबा झाला.
अटल सेतूवरुन मुंबईच्या दिशेने मराठा आंदोलकांनी प्रवास केला . त्यामुळं अटल सेतूवरही मोठी कोंडी निर्माण झाली होती. आंदोलकांच्या मागणीमुळं आणि पोलिसांच्या सुचनेनुसार एमएमआरडीएने अटल सेतूवरुन येणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली होती.
दरम्यान, 28 ऑगस्टला दुपारपासूनच आंदोलक मुंबई, नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाले होते. नवी मुंबईतील बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालयासह जागा मिळेल तिथे आंदोलकांनी मुक्काम केला होता. तसंच, वाशी टोलनाता ते वाशी प्लाझापर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग लागली होती.
