मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा निश्चय केला असून ते आज हजारो समर्थकांसहीत मुंबईत पोहोचणार आहेत. असं असतानाच आता या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर आता भाजपाने उद्धव ठाकरेंमुळेच मराठ्यांना फडणवीसांनी दिलेलं आरक्षण गेल्याचा उल्लेख केला आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
भाजपाचे माध्यम प्रतिनिधी नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेतून पक्षाची भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा, ‘औरंगजेब फॅन क्लब’ असा करत बन यांनी निशाणा साधला. ”’औरंगजेब फॅन क्लब’च्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकार वर टीका केली. त्यांनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा केला होता,” अशी आठवण बन यांनी करुन दिली. ”देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. 54 मोर्चे फडणवीसांनी हाताळले. आरक्षण देण्याचं काम फडणवीसांनी केलं,” असंही बन म्हणाले.
”आरक्षणावर बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही. ‘सामना’मध्ये ‘मुका मोर्चा’ म्हणणारे व्यंगचित्र राऊत यांनीच काढले होते. महायुतीने दिलेले आरक्षण मविआ सरकारमुळे गेलं. आरक्षणाचं पाप उद्धव ठाकरेंचं आहे. राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागावी, आरक्षणावर बोलण्याची त्यांची लायकी नाही, पात्रता नाही,” अशा घणाघात बन यांनी केला. ”16 टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठा आर्थिक विकास महामंडळ स्थापन फडणवीसांनी केलं,” अशी आठवण बन यांनी करुन दिली.
राऊतांनी काय टीका केलेली? ”राजकारण आम्ही करत नाही. राजकारण जे आहे जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं. तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे काम करतात. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईत महाराष्ट्रात उभारली. मराठा, ब्राह्मण, घाटी, कोकणी, 92 कुळी, 96 कुळी जो एक मंत्र दिला त्या मंत्राच्या टेकड्या उडव्याचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्याने झालं. मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं. त्यांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं.” असा घणाघाती आरोप राऊतांनी केला.
