Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

अॅक्झोन हॉस्पिटल इचलकरंजी येथे  नाका‌द्वारे (Endoscopic Transnasal) मेंदूच्या दोन दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या यशस्वी शस्त्रक्रियांची माहिती हॉस्पिटलचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. वैभव चव्हाण यांनी दिली.

डॉ चव्हाण यांनी सांगितले की साधारणतः मेंदूवरील शस्त्रक्रिया कवटी कापून केल्या जातात. परंतु पिट्यूटरी ग्रंथीवरील शस्त्रक्रिया तसेच नाका‌द्वारे पाणी येत असल्यास (Csf rhinorrhea) अशा विशेष शस्त्रक्रिया नाका‌द्वारे दुर्बिणीतून (Endoscopy) करता येतात. त्यामुळे रुग्णाचा त्रास व धोका कमी होतो.

२१ ऑगस्ट रोजी ५५ वर्षीय पुरुषावर पिट्यूटरी ग्रंथीवरील शस्त्रक्रिया नाका‌द्वारे दुर्बिणीतून करण्यात आली. ऑपरेशनपूर्वी त्यांना डोळ्यांना दृष्टी कमी आली होती, परतु शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या डोळ्यांची दृष्टी सुधारली असून त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.२२ ऑगस्ट रोजी  २५ वर्षीय तरुणावर आणखी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. डोक्याला मार लागल्यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याची नस दाबली गेली होती व दृष्टी हरवली होती. तसेच नाका‌द्वारे मेंदूतील पाणी येण्याची समस्या निर्माण झाली होती.शस्त्रक्रिये‌द्वारे डोळ्याची नस उघडण्यात आली (endoscopic optic nerve decompression) व नाका‌द्वारे येणारे पाणी (Csf rhinorrhea repair) थांबवण्यात आले. ऑपरेशननंतर रुग्णाच्या नाकातून पाणी पूर्णतः थांबले असून उजव्या डोळ्यात थोडा प्रकाश दिसू लागला आहे. भविष्यात दृष्टी अधिकाधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये डॉ.वैभव चव्हाण यांना ENT सर्जन डॉ. संदेश बागडी, भूलतज्ज्ञ डॉ. शरद मिठारी, तसेच डॉ. मधुरा देशपांडे व डॉ. त्रिशा चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

इचलकरंजीत अशा प्रकारच्या दुर्मिळ आणि अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यास Axon Hospital सक्षम ठरल्याब‌द्दल डॉ. वैभव चव्हाण व त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे.