ठाणे / महान कार्य वृत्तसेवा
कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत अमली पदार्थाच रॅकेट चालवणाऱ्या तस्करांचा भांडाफोड केला. विशाखापट्टनमच्या जंगलात सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे या जिगरबाज कारवाईत एकूण 13 तस्करांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून वॉकी टॉकी, पाच विविध वाहने आणि लाखोंचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबिवली गावातून एका ड्रग पेडलरला दहा ग्रॅम गांजासह अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असत कल्याण, पुणे आणि कोल्हापूर असा तपास करत पोलीस पथक थेट विशाखापट्टनमच्या जंगलात स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पोहोचले. त्यावेळी हे तस्कर जंगलात मोबाईलचे नेटवर्क नसल्यानं वॉकी टॉकीचा उपयोग करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल – पोलिसांनी आतापर्यंत या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात 13 आरोपींना अटक केली आहे. बाबर उस्मान शेख (वय 27), गुफरान शेख (वय 29), सुनील राठोड (वय 25) , आझाद अब्दुल शेख (वय 55) , रेश्मा अल्लाउद्दीन शेख (वय 44) , शुभम उर्फ सोन्या भंडारी (वय 26) , सोनू हबीब सय्यद (वय 24) , आसिफ शेख (वय 25), प्रथमेश नलावडे (वय 23) , रितेश पांडुरंग गायकवाड (वय 21) ,अंबादास नवनाथ खामकर (वय 25) ,आकाश बाळू भिताडे (वय 28) आणि योगेश दत्तात्रय जोध (वय 34) अशी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील बहुतांश आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
70 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त- अटक तस्करांकडून पोलीस पथकानं 115 किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती ठाणे जिल्हा पोलीस अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे. त्याची बाजारात किंमत 28 लाख 75 हजार आहे. यासह एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, वॉकी टॉकीचे दोन संच, दोन मोटार कार, एक ऑटोरिक्षा, एक बुलेट आणि दुचाकी आणि काही रोख रक्कम असा एकूण 70 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या पोलिसांनी कारवाईत घेतला सहभाग- अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे , गुन्हे पथकाचे मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक संभाजी नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, संदीप भालेराव , पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार सदाशिव देवरे, राजू लोखंडे, संदीप भोईर , योगेश बुधकर, निसार पिंजारी, पोलीस शिपाई सुरज खंडागळे, अनिल खरसान, राहुल शिंदे , अमित शिंदे , खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले आणि सुरेश खंडाळे या पोलीस पथकानं ही कामगिरी केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
