Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यासाठी आलेल्या कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजा उर्फ ध्रुव कुमारला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. आधी 3 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. निर्दोषत्व सिद्ध करण्याआधी घेतलेली रक्कम जमा करण्याची तुमची तयारी आहे का? असा सवाल हायकोर्टानं कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजाला विचारलाय.

कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजा उर्फ ध्रुव कुमारविरोधात मुंबई पोलिसांनी आंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. सिने निर्माता राघवेंद्र हेगडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय. ध्रुव सरजानं 9 कोटींना फसवल्याचा तक्रारीत आरोप आहे. या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी झाली आहे.

काय आहे तक्रार – सिने निर्माता राघवेंद्र हेगडे यांच्या तक्रारीनुसार एका सिनेमाच्या निर्मितीकरता त्यांचा ध्रुव सरजाबरोबर करार झाला होता. साल 2020 मध्ये निर्मात्यानं इतरांकडून कर्जावर पैसे घेत ध्रुव सरजाला रक्कम दिली होती. पण, पुढे त्याचं काहीच झालं नाही. मात्र, व्याजावर घेतलेली रक्कम आज 43 कोटींवर गेल्याचा दावा हेगडे यांनी दिलेल्या तक्रारीत केलाय.

काय आहे प्रकरण – सिने निर्माता हेगडे यांनी केलेल्या आरोपांनुसार साल 2019 मध्ये ध्रुव सरजानं त्यांच्याशी संपर्क साधत एका सिनेमाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर दोघांचं एकमत झाल्यानंतर हेगडे यांनी ध्रुव सरजाला 3 कोटी दिले होते. पण, कालांतरानं ध्रुव सरजानं निर्माता हेगडेंकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यांन निर्मात्याच्या कॉल आणि मेसेज यांनाही उत्तर देण बंद केलं. दुसरीकडे प्रोजेक्ट सुरूच न झाल्यानं व्याजावर घेतलेल्या रकमेचा आकडा फुगतच गेला.

ध्रुव सरजाकडून कोर्टात आलेलं स्पष्टीकरण – याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी ध्रुव सरजानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यात त्यानं हेगडे यांच्याकडून 3 कोटींची रक्कम स्वीकारल्याचं मान्य केलंय. मात्र, साल 2020 मध्ये करार झाल्यानंतर तीन वर्ष त्या प्रोजेक्टचं काहीच झालं नसून आपला काहीच दोष नव्हता, असं अभिनेत्यानं म्हटलं आहे. साल 2023 मध्ये हेगडे एक स्क्रिप्ट घेऊन आले होते. ही स्क्रिप्ट ध्रुव सरजानं फेटाळून लावली. त्यानंतर वर्षभरानं साल 2024 मध्ये त्यांनी सुधारीत स्क्रिप्ट आणून दिली. त्यानंतर थेट जुलै 2025 मध्ये त्यांनी कॉल करत आपल्याला एका गुंतवणूकदाराशी बोलण्यास सांगितलं. हा सिनेमा करण्यास बांधिल असल्याचा दावा ते करू लागले. त्याला नकार देताच पोलिसांत ही तक्रार देण्यात आलीय, असं ध्रुव सरजाच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं काय दिले निर्देश – सोमवारी दोन्ही बाजंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठानं ध्रुव सरजाला घेतलेली 3 कोटींची रक्कम कोर्टात जमा करण्यास तयार आहात का? असा सवाल केलाय. जर या फसवणुकीच्या आरोपांचं तुम्ही खंडन करताय तर मग घेतलेली रक्तम परत करण्याची तुमची तयारी आहे का? हे स्पष्ट करा, असे निर्देश न्यायालयानं ध्रुव सरजाला दिले आहेत. याप्रकरणाची सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करण्यात आली आहे.