Spread the love

विनिपेग (कॅनडा) / महान कार्य वृत्तसेवा

कॅनडातील विनिपेग इथं झालेल्या 18 वर्षांखालील महिला रिकर्व्ह स्पर्धेत पुण्याच्या मराठमोळ्या शर्वरी शेंडेनं 2025 च्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय संघाच्या मोहिमेचा शेवट केला. ऑलिंपिक डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार 16 वर्षीय शर्वरी ही दीपिका कुमारी (2011) आणि कोमलिका बारी (2021) नंतर महिला रिकर्व्ह प्रकारात तिसरी भारतीय विश्वविजेती ठरली. पात्रता फेरीनंतर 20 व्या क्रमांकावर असलेल्या शर्वरीनं तिच्यासमोरील सर्व अडचणींवर मात केली आणि तिच्या उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून एक संस्मरणीय सुवर्णपदक जिंकलं.

10-9 नं जिंकला अंतिम सामना : शर्वरीनं उपांत्य फेरीत कोरिया प्रजासत्ताकच्या तिसऱ्या क्रमांकाच्या किम येवोनचा 7-3 असा पराभव करुन अव्वल पोडियममध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळवली. तर सुवर्णपदकाच्या सामन्यात, सामना अत्यंत रोमांचक होता आणि 5-5 असा बरोबरीत झाला. परिणमी पदकाचा निर्णय शूट-ऑफमध्ये झाला आणि शर्वरीनं संयम राखत 10-9 असा सामना जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

काय म्हणाली शर्वरी : या ऐतिहासिक विजयानंतर शर्वरीनं ऑलिंपिक डॉट कॉमला आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ”मी खरोखरच विश्वविजेती आहे का? अरे देवा, हे अद्भुत होतं. मी फक्त एवढाच विचार करत होते की मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. एक बाण ठरवेल की मी विश्वविजेती होईन की नाही. माझे प्रशिक्षक मला सांगत होते की आत्मविश्वास बाळगा, स्वत:वर विश्वास ठेवा, तुम्हीच विजेता व्हाल.” तसंच ”मी नेहमीच जागतिक विजेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि हे माझे कॅडेट श्रेणीतील शेवटचं वर्ष आहे, म्हणून मला खूप अभिमान वाटत आहे, मला वाटते की मी माझ्या भारताला अभिमानानं उंचावलं आहे,” असंही तिनं सांगितलं.

भारताच्या नावावर आठ पदकं : याआधी स्पर्धेत शर्वरीनं 18 वर्षांखालील महिला रिकर्व्ह तिरंदाजी सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवण्यात आपली भूमिका बजावली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी 18 वर्षांखालील मिश्र रिकर्व्ह प्रकारात चिनी तैपेईचा पराभव करुन गाथा खडके आणि अगस्त्य सिंग यांनी आणखी एक कांस्यपदक जिंकलं. शेवटच्या दिवशी जिंकलेल्या दोन पदकांसह, स्पर्धेत भारताची एकूण पदकांची संख्या आठ झाली आहे, ज्यामध्ये चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकं आहेत. दोन वर्षांपूर्वी, लिमरिक इथं झालेल्या या स्पर्धेच्या शेवटच्या हंगामात भारतानं सहा पदकं जिंकली होती. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेची पुढील आवृत्ती 2027 मध्ये तुर्कीच्या अंताल्या इथं होणार आहे.