मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 29 तारखेला मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपदेखील केले आहेत. त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. लोकशाही मार्गानं आंदोलन करा, हिंदूंच्या सणात खोडा नको, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं आहे.
भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी कोकणातील गणेश भक्तांसाठी सोडलेल्या रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी रात्री 11.30 वाजता झेंडा दाखवला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिलं. मनोज जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक आहोत. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क आहे. पण, आंदोलन लोकशाही मार्गाने व्हावं. हिंदूंच्या सणांमध्ये कोणताही खोडा घालू नये. छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आंदोलकांनी संयम ठेवावा”, असं आवाहनही त्यांनी केलं.
मनोज जरांगे यांनी काय केले होते आरोप- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असा आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवलीमध्ये माध्यमांशी बोलताना केला होता. फडणवीसांनी गेल्या 8 महिन्यांत मराठा समाजाच्या हिताचा कोणताही निर्णय घेतला नाही, असंही ते म्हणाले होते.
…तोपर्यंत मुंबई सोडणार नाही – जरांगे- मराठा आणि कुणबी एकच आहेत, याची अंमलबजावणी व्हावी. जोपर्यंत हा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असं जरांगे अंतरवलीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करावं. गेल्या 13 महिन्यांपासून याचा अभ्यास सुरू आहे, तरीही निर्णय झालेला नाही. सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा. सगे-सोयरे यांना कुणबी नोंदींनुसार आरक्षण द्यावं. आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.
29 ऑगस्टला मुंबईत धडकणार- 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंतरवाली येथून आंदोलनाला सुरुवात होईल. अंतरवाली – पैठण – शेवगाव (अहिल्यानगर) – कल्याण फाटा – आळे फाटा – शिवनेरी (जुन्नर) येथे मुक्काम होईल. 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर मार्गे रात्री आझाद मैदानावर पोहोचणार आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन सुरू होईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. आंदोलन नेमकं कोणासाठी? – प्रकाश आंबेडकरांचा सवाल- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक्स मीडियावर पोस्ट करत जरांगे यांना थेट सवाल केला आहे. ”तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात, पण, सत्तेत असलेल्या श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा देत आहात. एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यांसारखे प्रस्थापित मराठे सत्तेत आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारमध्येही शरद पवार, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांसारखे मराठे होते. तुम्ही त्यांना निवडणुकीत पाठिंबा दिला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा तीच भूमिका घेऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?” असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
