नांदेड / महान कार्य वृत्तसेवा
ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं आहे. एका पित्यानंच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला ठार करून दोघांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. यानंतर आरोपी पिता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे सोमवारी (25 ऑगस्ट) सायंकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पित्यानं संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यावर पोलीसदेखील चक्रावून गेले.
नेमकी घटना काय? : उमरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अंकुश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील एका तरुणीचा गेल्या वर्षी गोळेगाव येथील तरुणाशी विवाह झाला होता. मात्र, तरुणीचे गावातीलच एका तरुणासोबत विवाहपूर्व प्रेमसंबंध होते. पण हे संबंध लग्नानंतरही सुरू राहिल्याचं पुढे उघडकीस आलं. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी प्रियकर तरुणाला वारंवार समज देऊन हे संबंध संपवण्यास सांगितलं होतं. पण, तरीही तो ऐकायला तयार नव्हता. अशा स्थितीत तो सोमवारी तरुणीला भेटण्यासाठी गोळेगाव येथील तिच्या सासरी पोहोचला. यानंतर दोघंही घरात आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. सासरच्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून बांधून ठेवलं. त्यांनी हा प्रकार तरुणीच्या वडिलांना कळवला. तरुणीचे वडील मारोती सुरणे आणि इतर दोघेजण गोळेगावला पोहोचले. सासरच्यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगून मुलीला घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानुसार वडील आणि अन्य नातेवाईक मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन गावाकडे निघाले.
रात्री विहिरीतून बाहेर काढले मृतदेह- बोरजुनी आणि गोळेगाव ही शेजारील गावं आहेत. या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पानंद रस्त्यानं जात असताना करकाळा शिवारात त्यांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेह चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत फेकून दिलं. घटनेनंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील मारोती सुरणे यांनी उमरी पोलीस ठाण्यात पोहोचून सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले. रात्री तरुण आणि तरुणीचं मृतदेह बाहेर काढण्यात आलं.
तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात- दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी उमरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात तरुणीचे आजोबा लक्ष्मण सुरणे, वडील मारोती सुरणे आणि काका माधव सुरणे या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
