नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
नाशिक शहरातील सारडा सर्कल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या थारमधून आलेल्या एकाने तरुणीला उचलण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी असलेल्या एका महिलेमुळे आणि पुरुषामुळे हा अपहरणाचा डाव फसला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच सारडा सर्कल परिसरात खासगी शिकवणीला जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीचे कारमधून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. एका जागृत महिलेच्या आणि व्यक्तीच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. तरुणीला मदत करणाऱ्या व्यक्तीने कारचा नंबर मुलीला दिल्याने त्यावरून पोलिसांनी संशयिताला पवननगर येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल गंजीभाई लीला (40) असे या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी 8 वाजता सारडा सर्कल येथून रस्ता ओलांडून नॅशनल ज्युनिअर कॉलेजजवळ आली असता एका पांढऱ्या रंगाच्या थार कारमधील व्यक्तीने कार थांबवली. ‘मेरे गाडी में बैठ आजा’ असे दोन वेळा तो बोलला. मुलीने लक्ष न देता पुढे चालत असताना संशयिताने कारने पाठलाग करत परत तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. मुलीने पाठीमागे वळून कारला गोल फिरून पळ काढला असता चालकाने आरशात बघून तिचा पाठलाग केला. मुलगी एका वृद्धेच्या पाठीमागे लपली. याचवेळी एक अनोळखी व्यक्तीने ‘क्या हुवा बेटा, इतनी क्यू घबराई हुई है’ असे विचारले. मुलीने सर्व प्रकार सांगितल्यानंतर या व्यक्तीने कारचा पाठलाग केला असता संशयिताने कार रिव्हर्स घेत पलायन केले. घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली हा सगळा प्रकार ण्ण्ऊन्नब मध्ये कैद झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुढील तपास करत आहेत.
