सातारा / महान कार्य वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी (24 ऑगस्ट) साताऱ्यातील दहिवडी येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी स्पष्ट भूमिका मांडली.
”आम्ही कर्जमाफीपासून कधीच बाजूला गेलो नाही. कर्जमाफी देणार नाही, असं आम्ही कधीच म्हटलं नाही. यासंदर्भात एक समिती नेमण्यात आली आहे आणि ती लवकरच सविस्तर माहिती देईल. योग्य वेळ येईल, तेव्हा कर्जमाफीही केली जाईल,” असं अजित पवार यांनी सांगितलं. तथापि, त्यांनी थेटपणे कर्जमाफी केव्हा दिली जाईल, याबाबत कोणतीही ठोस घोषणा केली नाही.
कर्जमाफीवरून पुन्हा अजित पवारांचं घुमजाव : दरम्यान, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यांवर अनेकदा वेगवेगळी विधानं केली आहेत. विशेष म्हणजे, ‘आता कर्जमाफी करू’ असं सांगणाऱ्या अजितदादांनी याआधी मात्र, ‘कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं? मी दिलं होतं का?’ असा थेट प्रतिप्रश्नच कोल्हापुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मे 2025 मध्ये केला होता. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. पण यावेळी मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी ‘वेळ आल्यावर कर्जमाफी करू’, असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे.
‘शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध सवलती’ : ”फक्त कर्जमाफी नव्हे, तर सरकारवर इतरही अनेक जबाबदाऱ्या आहेत. राज्याचा गाडा हाकायचा आहे,” असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ”केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये देतात. तसेच, तीन, पाच आणि साडेसात हॉर्सपॉवर क्षमतेच्या पंपाच्या वीजबिलांची माफी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महावितरणला वीजबिलापोटी 20 हजार कोटी रुपये भरते.”
कर्जमाफीच्या आश्वासनावर ठाम : महायुतीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी एक समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं. ”एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आर्थिक बाजू तपासावी लागते,” असे सांगत त्यांनी यामध्ये वेळ लागू शकतो, असे संकेत दिले. ”शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आखताना फक्त कर्जमाफीपुरतंच न थांबता शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकाला चांगला दर मिळावा, तसेच शासकीय योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात,” यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही अजित पवार यांनी नमूद केलं.
व्होट चोरीच्या आरोपांवर अजित पवार काय म्हणाले?: ”इकडे काही झालं की व्होट चोरीचा आरोप केला जातो, पण दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटका, तेलंगाणा, पश्चिम बंगालमध्ये एनडीए विरोधी पक्षांचं सरकार आलं, तेव्हा काहीच बोललं जात नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या व्होट चोरीवरील आरोपावर दिली. त्याच वेळी, राज ठाकरे यांनी गणपती आगमनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना घरी येण्याचं आमंत्रण दिल्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं, ”एक भाऊ दुसऱ्या भावाच्या घरी जाणार आहे. त्यात एवढं काय विशेष?” असं ते म्हणाले.
