Spread the love

बुलंदशहर (लखनौ) / महान कार्य वृत्तसेवा

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात भीषण अपघात घडला आहे. एनएच 34 वरील अरनिया भागातील घटाल गावात ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कंटेनर ट्रक जोरदार धडक दिल्यानं 8 भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळी जिल्हादंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकारी पोहोचले आहेत. पोलीस पथकांकडून जखमींना रुग्णालयात पाठविले जात आहे. तर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले जात आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अलीगढ बॉर्ड एनएच 34 वर ट्रॅक्टरमध्ये बसून 60 ते 61 भाविक हे राजस्थानमधील कासगंज जिल्ह्यात जात होते. यावेळी भरधाव वेगानं आलेल्या कंटेनरनं ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टर पलटी झाले. अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर अपघातस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना ट्रॅक्टर ट्रॉलीमधून काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) दिनेश कुमार सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत. पोलिसांकडून अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

39 जणांना गंभीर दुखापत – अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण कासगंज जिल्ह्यातील रहिवासी होते. ईयू बाबू (40 वर्षे), रामबेती, चांदणी (12), घनीराम (40 वर्षे), मोक्षी (40 वर्षे), शिवांश (6 वर्षे), योगेश (50 वर्षे) आणि विनोद (45 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. रघुवीर, हरिसिंग, प्रिन्स, मूलचंद, दिव्या, शकुंतला, पतिराम, मुस्कान आणि इतर सुमारे 50 जण अपघातात जखमी झाले. यापैकी 39 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलंदशहरचे एसएसपी दिनेश कुमार सिंह यांनी मृतांमध्ये एक मूल आणि दोन महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं. भाविक जहारपीरच्या (गोगाजी) दर्शनासाठी कासगंजहून राजस्थानमधील गोगामेडी येथे प्रवास करत होते.