Spread the love

मॅके / महान कार्य वृत्तसेवा

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा वनडे सामना ग्रेट बॅरियर रीफ अरेना मॅके इथं खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियानं या सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. सलामीवीर ट्रेविस हेड आणि मिशेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 250 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे 2023 च्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी वनडे सामन्यात 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.

हेड आणि मार्श यांची तिसऱ्या वनडेत वादळी फलंदाजी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर आतापर्यंत फॉर्ममध्ये दिसत नव्हते. विशेषत: ट्रेविस हेडची बॅट अजिबात चालत नव्हती, परंतु या सामन्यात तो सुरुवातीपासूनच उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता. या सामन्यात ट्रेविस हेड 142 धावांवर बाद झाला. मार्श आणि हेडसमोर आफ्रिकन गोलंदाज असहाय्य दिसत होते. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी वनडे सामन्यांमध्ये गेल्या 23 डावांमध्ये 100 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केलेली नव्हती. ट्रॅव्हिस हेडशिवाय या सामन्यात कर्णधार मिचेल मार्शनंही 106 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यामध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. मार्शनं त्याच्या कारकिर्दीतील चौथं वनडे शतक झळकावलं.

2023 च्या वनडे विश्वचषकात झाली होती शतकी भागीदारी : यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शेवटच्या वेळी 2023 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 100 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली होती. त्या सामन्यातही ट्रॅव्हिस हेडनं शतक ठोकलं होतं आणि 109 धावा काढून बाद झाला. त्याच वेळी त्याचा साथीदार डेव्हिड वॉर्नरनं 65 चेंडूत 81 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी झाली.

22 वर्षांनंतर घडला पराक्रम : यासह 22 वर्षांनंतर असं घडलं आहे की, जेव्हा विरोधी संघाच्या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात शतकं झळकावली आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्यापूर्वी इंग्लंडच्या व्ही. सोलंकी (106 धावा) आणि मार्कस ट्रेस्कोथिक (114 धावा) यांनी 2003 मध्ये शतकं झळकावली होती. आता ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी 22 वर्षांच्या ऐतिहासिक विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.

ऑस्ट्रेलियानं उभारला धावांचा हिमालय : या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्या सलामीवीरांनी आतापर्यंतच अपयस धुवून काढत पहिल्या विकेटसाठी 250 धावांची भागीदारी केली. यानंतर लागोपाठ दोन विकेट गेल्या. नंतर कॅमेरुन ग्रीन (118ङ) आणि ऍलेक्स कॅरीनं (50ङ) तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 82 चेंडूत 164 धावांची वादळी भागीदारी करत संघाला 431 धावांपर्यंत पोहोचवलं.

ट्रॅव्हिस हेडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8000 धावा : या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ट्रॅव्हिस हेडच्या रुपात बसला. त्यानं 103 चेंडूत 142 धावांचा तडाखा दिला. या खेळीदरम्यान हेडनं 17 चौकार आणि 5 षटकार मारले. या दरम्यान, त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8000 धावाही पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, हेडनं आतापर्यंत 177 सामन्यांच्या 214 डावांमध्ये 40.73 च्या सरासरीनं 8024 धावा केल्या आहेत.