Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगर विकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. नगर विकास खात्याची अत्यंत सुमार कामगिरी असं म्हणत अधिकाऱ्यांनी तातडीने सगळ्या सुधारणा कराव्यात अशा सूचना दिल्या. केंद्र सरकारच्या योजनासंबंधीच्या पुनरावलोकन बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला खडे बोल सुनावले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ऑल इज नॉट वेलच्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्याने केंद्र सरकारच्या योजना दाखवण्यात सुमार कामगिरी केली असल्याचं परखड मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्याचं कळतं आहे.

एकनाथ शिंदे बैठकीला अनुपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कामगिरीची माहिती घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि उपस्थित नव्हते. इतर मंत्री या बैठकीत उपस्थित होते. केंद्र सरकारच्या योजनांची आपल्याला व्यवस्थित अंमलबजावणी करायची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच आत्तापर्यंत झालेल्या कामगिरीचा आढावाही त्यांनी घेतला. त्यावेळी नगरविकास खात्याने अश्ठळऊ 2.0 या योजनेच्या अंमलबजावणीत कुचराई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृत म्हणजेच अटल मिशन रिज्युवेननेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या योजनाचा दुसरा टप्पा 2021 ते 2026 असा आहे. आत्तापर्यंत जी कामगिरी करण्यात आली त्यात नगरविकास खात्याने कामचुकारपणा केल्याबद्दल त्यांच्या कामावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं बैठकीत काय घडलं?

केंद्र सरकारने आपल्याला अमृत योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रीन पार्क, शहरीकरणातला विकास यासाठी निधी दिला आहे. त्याचा विनियोग तुम्ही कशा प्रकारे केलात? असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांना कंत्राटं दिली आहेत त्यांच्याकडून कामं मुदतीच्या आधी पूर्ण करुन घ्या अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून आणि शिवसेनेतून बाहेर पडत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर जून 2022 ते ऑक्टोबर 2024 अडीच वर्षे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळीही नगरविकास विभाग हा त्यांच्याकडेच होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. आताही त्यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. या विभागाने अटल योजनेच्या अंतर्गत योग्य कामगिरी केली नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं आहे.