नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
फुटबॉल जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोनं आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या पोर्तुगीज दिग्गजानं असा विक्रम केला आहे, जो आतापर्यंत कोणत्याही खेळाडूच्या नावावर नव्हता. चार वेगवेगळ्या क्लब आणि आपल्या देशासाठी 100 किंवा त्याहून अधिक गोल करणारा रोनाल्डो फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.
रोनाल्डोनं केला 100 वा गोल : सौदी सुपर कपच्या अंतिम फेरीत अल नसरसाठी 100 गोल करण्याचा महान पराक्रम रोनाल्डोनं केला. मात्र या जेतेपदाच्या सामन्यात रोनाल्डोच्या संघाला अल अहलीविरुद्धच्या रोमांचक सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये 3-5 असा पराभव पत्करावा लागला. निर्धारित वेळेपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला, ज्यात अल अहलीनं सौदी सुपर कपचं विजेतेपद जिंकलं.
चार क्लबनध्ये 100 गोल : रोनाल्डोनं स्पोर्टिंग लिस्बनकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यात त्यानं लहान वयातच आपली प्रतिभा सिद्ध केली. यानंतर, त्याचा प्रवास मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि जुव्हेंटस सारख्या मोठ्या क्लबमधून गेला. सध्या तो सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबकडून खेळत आहे. प्रत्येक क्लबमध्ये त्याची कामगिरी गोल मशीनसारखी होती आणि आता त्यानं चार क्लबमध्ये 100 गोल करण्याचा विक्रम केला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलपटू : अल नसरपूर्वी रोनाल्डोनं रिअल माद्रिदसाठी 450, मँचेस्टर युनायटेडसाठी 145 आणि युव्हेंटससाठी 101 गोल केले होते. त्यानं आपला देश पोर्तुगालसाठी 138 गोल देखील केले आहेत. तो असा फुटबॉलपटू आहे ज्यानं एका देशासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल केले आहेत. विशेष म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डोची कारकीर्द 20 वर्षांहून अधिक काळाची आहे आणि या काळात त्यानं फिटनेस, समर्पण आणि कठोर परिश्रमानं स्वत:ला जगातील सर्वात विश्वासार्ह स्ट्रायकर म्हणून सिद्ध केलं आहे. तो आता 39 वर्षांचा असला तरी, गोल करण्याची त्याची आवड आणि भूक अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला होती तितकीच आहे.
