ब्रिस्बेन / महान कार्य वृत्तसेवा
ऑस्ट्रेलिया अ महिला क्रिकेट संघानं एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ महिला संघाचा 6 विकेट्सनं पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी भारत अ संघानं ऑस्ट्रेलिया महिला संघासमोर 281 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे यजमान संघानं सामन्याच्या चौथ्या दिवशी सहज साध्य केलं. या धावांच्या पाठलागात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनिका लॉयडनं संघासाठी सर्वाधिक 72 धावा केल्या.
चौथ्या दिवशी टीम इंडियाचा डाव लवकर संपला : या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतानं 8 विकेट्स गमावून 260 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी भारतीय संघानं येथून आपला डाव सुरु केला आणि 286 धावा करुन सर्वबाद झाला. भारतासाठी राघवी बिश्तनं या डावात सर्वाधिक 86 धावा केल्या आणि तिच्याशिवाय शेफाली वर्मानं 52 धावांची खेळी केली. अशाप्रकारे, भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 281 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी शानदार कामगिरी : 281 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवशी चांगली सुरुवात केली. टहलिया विल्सन आणि राहेल ट्रेनामन यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा जोडल्या. साईमा ठाकोरनं भारताला पहिले यश मिळवून दिलं, तिनं टहलिया विल्सनला बाद केलं. तिच्या बाद झाल्यानंतर राहेल ट्रेनामन देखील लवकरच बाद झाली, तिनं 64 धावा केल्या. यानंतर मॅडी डार्कनंही शानदार फलंदाजी केली आणि 68 धावांचं योगदान दिलं. परिणामी संघानं 85.3 षटकांत 4 गडी गमावून 281 धावांचं लक्ष्य गाठलं. पहिल्या डावात राघवी बिश्तनं केल्या होत्या 93 धावा : या सामन्यात भारत अ संघानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 299 धावा केल्या. त्या डावातही राघवी बिश्तनं टीम इंडियासाठी सर्वाधिक 93 धावा केल्या. बिश्तला दोन्ही डावात शतक पूर्ण करण्याची संधी होती, पण ती तसं करु शकली नाही. राघवी व्यतिरिक्त जोशिता व्हीजेनेंही 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं झाले तर, पहिल्या डावात सिएना जिंजरनं शतक झळकावले आणि 103 धावा केल्या. तिच्याशिवाय निकोल फाल्टमनं 54 आणि ताहलिया विल्सननं 49 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियानं त्यांच्या पहिल्या डावात 305 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेतली होती.
