पूर्णिया (पाटणा) / महान कार्य वृत्तसेवा
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेत मोटारसायकलवरून प्रवास केला.
राज्यातील एसआयआरमधील कथित अनियमिततेविरोधात राहुल गांधींनी मतदार यात्रा काढली आहे. शनिवारी कटिहारमध्ये संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपाकडून गरिबांचा आवाज दाबण्यासाठी संस्था आणि माध्यमांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला.
”वोट चोर गड्डी सोड” असा नारा देत राहुल गांधी सभेत म्हणाले, ”हे तुमचे माध्यम नाही. ‘वोट चोर गड्डी सोड’. आता संध्याकाळी टीव्ही पाहा. तुम्हाला ही घोषणा दिसणार नाही. तुम्हाला ते कुठेही दिसणार नाही. तुम्हाला ही गर्दी दिसणार नाही. कारण ही गरिबांची गर्दी आहे. ही कामगारांची गर्दी आणि शेतकऱ्यांची गर्दी आहे. आपण मते चोरू देऊ नयेत.” दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना सैन्य आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रवेशापासून वंचित ठेवले जात आहे. बिहारमध्ये मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
गुन्हेगारीमुक्त सरकार देण्यासाठी काम करू- तेजस्वी यादव यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ”या अधिकाऱ्यांनी आणि भ्रष्ट सरकारनं केवळ निवासी प्रमाणपत्रे आणि जात प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी 4 हजार कोटी रुपये घेतले आहेत. भाजपाचे लोक हे पैसे निवडणुकीत वापरतील. त्यामुळेच भ्रष्टाचार सतत वाढत आहे. आम्ही भ्रष्टाचारमुक्त, गुन्हेगारीमुक्त सरकार देण्यासाठी काम करू”, असे तेजस्वी यादव यांनी म्हटलं.
1,300 किमी अंतराची आहे यात्रा- बिहारमधील 65 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळल्याचा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे. या विरोधात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मतदार अधिकारी यात्रेला निघाले आहेत. 20 जिल्ह्यांमध्ये 1,300 किमी अंतराची 16 दिवसांची मतदार अधिकार यात्रा विरोधी पक्षांनी काढली आहे. हा मोर्चा 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे संपणार आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी रोहतासमधील सासाराम येथून या यात्रेला सुरुवात झाली. राज ठाकरे मतचोरीच्या आरोपावर काय म्हणाले? काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रासह कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांना अप्रत्यक्षपणं पाठिंबा दिला आहे. ”राहुल गांधी यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. मतदानातच गडबड आहे. आपली मतं चोरली जात आहेत. लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत पोहचलं नाही,” असं म्हणत मनसे अध्यक्षांनी मतचोरी प्रकरणावर प्रथमच पुण्यात बोलताना भूमिका स्पष्ट केली.
