मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
”भारतासारख्या महान देशात नरेंद्र मोदी हे मतचोरी करून सत्तेवर आले आहेत, हा संदेश आता जगभर पोहोचला आहे. लिबियामध्ये जे गद्दाफी (मुअम्मर) करत होता, युगांडामध्ये ईदी अमिन, इराकमध्ये सद्दाम हुसेन, सिरीयामध्ये बशर अल-असद आणि रशियामध्ये पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले. किंबहुना पाकिस्तानमधले लष्करशाह ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात, त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी भारतात निवडणुका जिंकल्या. त्यात महाराष्ट्रातील निवडणुकांचा देखील समावेश आहे,” असा हल्लाबोल शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील मतं गेली कुठं? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा : संजय राऊत यांनी मुंबईत रविवारी (24 ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ”विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रश्न उपस्थित केला की, आमची मतं गेली कुठं? इतकंच नव्हे, तर संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही हा प्रश्न विचारला, ते न्यायालयातही गेले. राहुल गांधी, तेजस्वी यादव यांनी हा मुद्दा आता घराघरात पोहोचवला आहे. जेव्हा एखाद्या राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन प्रश्न विचारतात, तेव्हा त्या प्रश्नाना गांभीर्यानं समजून घेतलं पाहिजे. आमची मतं गेली कुठं? हा प्रश्न आम्ही आणि महाराष्ट्रातील जनता मागील आठ महिन्यांपासून विचारत आहे. महाराष्ट्रातील मतं गेली कुठं? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची उत्तरं द्यावीच लागतील. तसंच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीतील लोकं जनतेनं आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असतील, तर ते खोटं बोलत आहेत,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
जावेद मियाँदादला वेंगसरकर अचानक मातोश्रीवर घेऊन आले : पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला मातोश्रीवर जेवायला कोणी बोलावलं होतं?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितलं की, ”देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत, उलट संपूर्ण भाजपाच हा अर्धवट ज्ञानी आहे. काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, पण यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही. त्यांनी मी काढलेला शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चित्रपट पाहावा. त्या काळातल्या बाळासाहेबांच्या मुलाखती पाहाव्यात. ‘एक वचनी’ या पुस्तकात बाळासाहेबांनी याबाबत भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियाँदादला अचानक मातोश्रीवर घेऊन आले. ते बाळासाहेबांना विनंती करायला आले होते, की भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला तुम्ही विरोध करू नका. पुन्हा सामने सुरू करा. पण, त्यांना बाळासाहेबांनी तोंडावर सांगितलं, की दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात सुरू आहे, तोपर्यंत मी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ देणार नाही, हे बाळासाहेबांनी त्यांना तोंडावर सांगितलं होतं,” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदी ट्रम्प, पाकिस्तान, चीनसमोर झुकले :
पुढं संजय राऊत म्हणाले, ”मिस्टर फडणवीस, बाळासाहेबांनी तुमच्या नरेंद्र मोदींसारखं प्रेसिडेंट ट्रम्पसमोर, पाकिस्तान किंवा चीनसमोर शेपूट घातलं नाही. ऑपरेशन सिंदूरवेळी नरेंद्र मोदी काय म्हणाले? रक्त आणि पाणी एकावेळी वाहणार नाही. मग आता क्रिकेट चालतं का? बाळासाहेबांनी मियाँदादला तोंडावर सांगितलं होतं, ‘चाय पियो और निकल जाओ’. या घरात पाहुणा म्हणून आला आहेस, चहा प्यायचा आणि निघून जायचं. हे तुम्ही दिलीप वेंगसरकरांना विचारू शकता”.
”देवेंद्र फडणवीस हे खरोखरच राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या बहिणींनी पहलगाममध्ये आपलं कुंकू पुसलं, त्यांची जर त्यांना कदर असेल, तर ते अशी विधानं करणार नाहीत. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास तुमचा पाठिंबा आहे का? एवढंच सांगा. भाजपानं पाकिस्तानसमोर शेपूट घातली आहे. पैशांसाठी तुम्ही कोणाची तरफदारी करत आहात?,” असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
याचबरोबर, ”फडणवीसांनी लाडक्या बहिणींकडून काल राख्या बांधून घेतल्या. ज्या 26 महिलांनी पहलगाममध्ये कुंकू पुसून घेतलं. त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? भाजपा म्हणजे खोटं बोलायची फॅक्टरी आहे. पंडित नेहरूंचा 60 वर्षे जुना विषय, जावेद मियाँदादचा 40 वर्ष जुना विषय काढण्यापेक्षा स्वत:चं बोला. तुम्ही स्वत: उघडे आणि नागडे पडले आहात,” असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
पैसे देऊन मतं विकत घेतली : महाराष्ट्रात 26 लाख बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. त्याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ”आपापल्या मतदारसंघात बोगस लाडके भाऊ, लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली. हा सुद्धा गुन्हा मतं चोरीमध्ये मोडतो,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेऊन लगावला.
महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? : सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्याविषयी केलेल्या विधानानंतर भाजपाकडून चौफेर टीका केली जातेय. त्याविषयी विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, ”महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? महाराष्ट्राचा मराठा धर्म कोणी नष्ट केला आहे का? असं असेल तर सांगा. कोणी काय खावं, हे तुम्ही ठरवू शकत नाही. फडणवीसांना सांगा, तुम्ही चोरून काय खाता? मला ते आम्हाला माहिती आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? आम्हाला माहीत नाही का फडणवीस काय खातात? मटन चिकन का महाग झाले, आम्ही खातो म्हणून नव्हे, तर जे काल खात नव्हते ते आज रांग लावत आहेत”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
अध्यात्मामध्ये गुंड आणि माफियांचा शिरकाव : संग्राम बापू यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवताना संजय राऊत यांनी सांगितलं की, ”हा अध्यात्माचा विषय आहे. अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहेत. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. बाळासाहेब थोरात यांच्याबाबतीत जे घडलं, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. याचा धिक्कार राज्याचा मुख्यमंत्र्यांनी देखील केला पाहिजे,” असं संजय राऊत म्हटलं आहे.
