नांदेड / महान कार्य वृत्तसेवा
शहरामध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल थरार पहायला मिळाला. सुरज सिंग गाडीवाले हा सराईत गुन्हेगार आहे. विविध गुन्ह्यांमध्ये गाडीवाले हा पोलिसांना हवा आहे. अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना आरोपी गाडीवाले हा नांदेड शहरातील कौठा भागात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या भागात धाव घेतली. सुरससिंग गाडीवालेनं पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाहताच त्यांच्या दिशेनं गावठी पिस्तूल रोखली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून गोळी झाडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कौठा परिसरात पोहोचले. सराईत गुन्हेगार सुरज सिंग हा कारमधून आला. मात्र, पोलीस आल्याची त्याला कुणकुण लागली. त्याने गाडी पळवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याचा पाठलाग केला. तेव्हा आरोपी सुरजसिंग गाडीवाले यानं स्वत: जवळील गावठी पिस्तूल काढली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळी झाडली. अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाल्यानंतर त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. पोलिसाकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.
कोण आहे हरविंदर सिंग रिंधा- हरविंदर सिंग रिंधा हा बब्बर खालसा इंटरनॅशनल (ँख्घ्) या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तो पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. त्याच्यावर खून, अपहरण, मनी लाँड्रींग दहशतवाद आणि शस्त्र तस्करीासरखे गुन्हे दाखल आहेत. त्याला भारत सरकारनं दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. पंजाब पोलीस एटीएस, एनआयए आणि नांदेड पोलिसाकडून त्याचा शोध सुरू आहे. तो सध्या पाकिस्तानात असल्याचा संशयदेखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रिंधाची कामे आरोपी गाडीवाले करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गाडीवाले याच्यावर खंडणी, अपहरण, जबरी चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि धमकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हरविंदर सिंगच्या साथीदारांना पकडण्याचं मोठं आव्हान- दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा हा नांदेडात वास्तव्यास असताना त्यानं खंडणीसाठी अनेकांना धमकावलं होतं. काही जणांवर गोळीबारही करून त्यानं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. व्यावसायिक बियाणीच्या हत्येचा मुख्य सूत्रधारही रिंदाच असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं. रिंदाचे अनेक साथीदार आजही नांदेडात असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर दुसरीकडं पंजाबमध्ये गंभीर गुन्हे करणारे अनेक आरोपी नांदेडात आश्रय घेतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना पकडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
