Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

मुळात ऑगस्टमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका होणार होती. पण बीसीसीआय आणि बीसीबी यांच्यातील चर्चेनंतर ही मालिका 2026 च्या सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता कोहली आणि रोहित शर्मा यांची पुनरागमनाची संधी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मिळणार आहे. पर्थच्या मैदानावर 19 ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर 23 आणि 25 ऑक्टोबरला उर्वरित सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहलीला खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत, मात्र यासाठी त्यांना ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोहलीचा नवा प्लॅन काय?

आयपीएल 2025 संपल्यानंतर कोहली काही काळ ब्रेकवर होता. त्याने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून मागे हटण्याचा निर्णय घेतला असून आता तो फक्त वनडे फॉरमॅटवर लक्ष केंद्रीत करणार आहे. याच तयारीसाठी तो लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर सराव करताना दिसला. कोहलीने सरावासोबत चाहत्यांसोबत फोटोही काढले.

2027 चा वनडे वर्ल्ड कप दोन वर्षांवर आला आहे. त्यामुळे कोहलीला आपली लय आणि सातत्य टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण नव्या पिढीतील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. आतापर्यंत कोहलीने 302 वनडे सामन्यांत 14,181 धावा केल्या आहेत. अलीकडेच आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात त्याने 43 धावांची महत्त्वाची खेळी करत आरसीबीला पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकून दिली.

शतकांचा बादशहा किंग कोहली

सध्या कोहलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 82 शतकांचा विक्रम आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 51 शतके झळकावली असून कसोटीत 30 आणि टी20 मध्ये एक शतक केले आहे. सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम गाठण्याची क्षमता फक्त कोहलीमध्ये असल्याचे तज्ज्ञ मानतात.