Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात थांबलेल्या कुशीनानगर एक्स्प्रेसमध्ये एका तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. शनिवारी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आरव शाह हा सूरत येथील त्याच्या राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. 21 ऑगस्टपासून तो गायब होता. त्याच्या पालकांनी यासंदर्भात तक्रारदेखील नोंदवली होती. तसंच, त्याचे अपहरण त्याचाच चुलत भाऊ विलास कुमार शाह याने केले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. सध्या गुजरात पोलिस आणि मुंबई रेल्वे पोलिस विलासचा शोध घेत आहेत.

शनिवारी, कुशानगर एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचल्यानंतर कर्मचारी साफसफाई करत होते. तेव्हा एका कर्मचाऱ्याला लहान मुलाचा मृतदेह कचराकुंडीत सापडला. तेव्हा त्याने लगेचच रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. चिमुकल्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश त्याची आई दुर्गादेवी आणि दोन भावंडासह सूरत येथे राहत होता. त्याचे वडिल आखाती देशात मजूर म्हणून काम करतात. तर त्याची आई मजुरी करते. गेल्या आठवड्यात दुर्गादेवी हिची बहीण राबडी आणि तिचा मुलगा विकास बिहारमधून सूरतला आले होते.

दुर्गादेवी तिच्या दोन्ही मुलांना शाळेत घेऊन गेली होती. त्यावेळी घरात आकाश आणि रबडी होते. सुरुवातीली विकासदेखील दुर्गादेवी यांच्यासह शाळेत जात होता. मात्र अर्ध्या रस्त्यातूनच तो पुन्हा घरी आला. दुर्गादेवी घरी आल्यानंतर त्यांना आकाश कुठेच दिसला नाही. तिने राबडी यांना विचारलं असता तिने सांगितलं की विकास त्याला खेळायला घेऊन गेला आहे.

मात्र खूप वेळ झालातरी विकास आला नाही तेव्हा दुर्गादेवी यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र तो कुठेच सापडला नाही तेव्हा तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासलं असता. विकास आणि आकाश मोटारसायकलने सूरत रेल्वे स्थानकात पोहोचले होते. आकाशची हत्या विकासनेच केली का? तसंच, हत्या का व कशासाठी करण्यात आली? याचा तपास पोलिस करत आहेत. विकास हा बेरोजगार होता. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.