मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्याबाबत सुरू असलेल्या वादाचा राजकीय वतुर्ळात मोठा परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून शिवसेना (ठाकरे गट)वर टोला लगावला. त्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पलटवार करत फडणवीसांना ‘अर्धवट ज्ञानी’ ठरवले. केवळ फडणवीसच नव्हे तर भाजपच्या नेत्यांकडेही ‘मेंदू नाही’, सगळं भाजप अर्धवट ज्ञानी असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. मियाँदाद मातोश्रीवर आल्यावर काय घडलं होतं, हे दिलीप वेंगसरकर यांना विचारावे, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात भाजप हाच अर्धवट ज्ञानी आहे. त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही. काहीजणांच्या गुडघ्यात मेंदू असतो. तो भाजपच्या गुडघ्यात देखील नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजेत. जे पुस्तक आहे एकवचनी त्यात बाळासाहेब यांनी भूमिका स्पष्ट मांडल्या आहेत. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर जावेद मिया यांना घेऊन मातोश्री वर आले. जावेद मिया तिथे का आले होते? तर ते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते की, भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करू नका, पुन्हा मॅच सुरू करा. बाळासाहेबांनी त्यांना तोंडावर सांगितलं, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. जोपर्यंत पाकिस्तानचा काश्मीरमध्ये रक्तपात सुरू आहे, तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला परवानगी देणार नाही.
रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही
मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदींसारखं त्यांनी शेपूट घातलं नाही, पाकिस्तानसमोर किंवा ट्रम्प समोर, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही बाळासाहेबांनी तोंडावर सांगितलं, चाय पियो और निकल जाओ, त्या घरात तू पाहूणा म्हणून आला आहे, चहा घे आणि जा हे तुम्ही दिलीप वेंगसरकर यांना विचारू शकता असेही पुढे राऊतांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपला कुंकू पुसलं, त्या कुंकवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधाने करणार नाहीत, असेही संजय राऊतानी संतापून म्हटल आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरु केली आहे. मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघर्डे ेंगडे दिसाल. तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला.
