Spread the love

चेतेश्वर पुजाराची ऑस्ट्रेलिया विरुद्धची खेळी कोणीही विसरणार नाही, काय घडलेलं?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्ती घेतली आहे. सर्व प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचं चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. चेतेश्वर पुजाराचे कसोटी क्रिकेटमध्ये मोठे योगदान राहिले आहे. 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा सिरीज जिंकण्यात चेतेश्वर पुजाराचा मोलाचा वाटा राहिला. चेतेश्वर पुजारा भारतासाठी भिंतीसारखा उभा राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, जॉश हॅजलवूड, मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला होता. यावळी चेतेश्वर पुजराने अनेक चेंडूंचे वार अंगावर झेलले. यावेळी त्याला गंभीर दुखापत देखील झाली. चेतेश्वर पुजारा मैदानात वेदनेने विव्हळत होता. परंतु मैदान न सोडता चेतेश्वर पुजारा भारतासाठी शेवटपर्यंत लढत राहिला.

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा सिरीज जिंकण्यात चेतेश्वर पुजाराचा मोलाचा वाटा-

2018-2019 साली बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची स्पर्धा भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आली होती. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-0 असा विजय मिळवला होता. भारताने चेतेश्वर पुजाराच्या बळावर ॲडलेडमध्ये कसोटी सामना जिंकला तेव्हा तो एक अतिशय ऐतिहासिक क्षण होता. तब्बल 15 वर्षांनी ॲडलेड ओव्हलवर भारताने विजय मिळवला. यापूर्वी 2003 मध्ये ॲडलेडमध्ये भारताने कसोटी सामना जिंकला होता. 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या ॲडलेड कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने भारताच्या पहिल्या डावात 123 धावांची लढाऊ खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाने 250 धावांचा सन्मानजनक धावसंख्या उभारली. इतकेच नाही तर चेतेश्वर पुजाराने भारताच्या दुसऱ्या डावात 71 धावांची मौल्यवान खेळीही खेळली. यामुळे भारताने विजय मिळवला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला. ॲडलेड कसोटीचा नायक असलेल्या चेतेश्वर पुजारासाठी आशियाबाहेर हा पहिलाच ‘सामनावीर’ पुरस्कार होता. चेतेश्वर पुजाराची ही महान खेळी, जी कोणताही भारतीय विसरू शकणार नाही, अशी होती. तसेच ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजांना चेतेश्वर पुजाराने अक्षरश: रडून सोडले होते.

चेतेश्वर पुजाराची कारकीर्द-

चेतेश्वर पुजाराने 2010 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून 2023 पर्यंत त्याने 103 कसोटी आणि फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले. 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 15 धावा केल्या. तो 2013 ते 2014 पर्यंत या स्वरूपात खेळला. त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही संधी मिळाली नाही. त्याचवेळी, चेतेश्वर पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 7195 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 19 शतके, 35 अर्धशतके आणि 3 द्विशतकांचा समावेश आहे. एका दशकाहून अधिक काळ, चेतेश्वर पुजाराला भारताच्या कसोटी संघाचा कणा म्हणून ओळखले गेले आणि अनेक प्रसंगी त्याने भारतीय संघाचा झेंडा उंचावला.