मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचे आरोप जोर धरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट आरोप करत त्यांना धारेवर धरलं आहे. आता या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेत मतचोरीच्या आरोपांवर थेट भाष्य केलं आहे. पुण्यात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ”मनसेच्या उमेदवारांना मतं मिळत आहेत, मात्र ती मतं लाटली जात आहेत. मतचोरी झालेली आहे,” असा खळबळजनक आरोप केला आहे. आता राज ठाकरे यांच्या आरोपावर मनसेतून राजकीय ओळख मिळालेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना सुनावले आहे.
नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर?
प्रवीण दरेकर यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी केलेले आरोप असे तोंडी चालत नसतात. राज ठाकरेंकडे काही पुरावे असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला द्यावेत. निवडणूक हरल्यानंतर असे कारण दिले जातात. येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका असणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार विकासावर काम करत आहे. उद्याचा पराभव दिसत आहे म्हणून असे काही प्रश्न पुढे आणले जात आहेत, असे म्हणत प्रवीण दरेकर राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे यांना हे शोभणारे नाही : प्रवीण दरेकर
दरम्यान, मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरी येथील केले. याबाबत विचारले असता प्रवीण दरेकर म्हणाले की, कोणी काय खायचे ते खा, बंदी नाही. आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा आहे. सुप्रिया सुळे यांना हे शोभणारे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत दरेकरांचं भाष्य
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाची तिढा अद्यापही महायुतीत सुटलेला नाही. नुकताच गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय. याबाबत विचारले असता चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारला. तो माझा प्रश्न नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तो प्रश्न सोडवतील. रायगड किंवा नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिळावे ही माझी भूमिका आहे. छगन भुजबळ यांचे बळ हे सरकार मधलेच बळ आहे. हे आमचं एकत्रित बळ आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
