Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
बांधकाम सुरु असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून पाचजण जखमी झाले. तसेच प्रापंचिक साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेस जबाबदार बांधकाम मालक नानासो शिवाजी वायदंडे (वय ५९ रा. लालनगर) यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमीर शाहबुद्दीन गोलंदाज (वय ४४ रा. सहारा निवारा कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जमीर गोलंदाज हे सेंट्रीग कामगार असून ते सहारा निवारा कॉलनीत भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. त्यांच्या घरालगतच नानासो वायदंडे यांचे मालकीचे आरसीसी बांधकाम सुरू आहे. जमीर गोलंदाज, त्यांच्या पत्नी जबीन गोलंदाज, मुलगा अमन, मुली आलिया व आलिशा तसेच शाहबुद्दीन गोलंदाज हे गाढ झोपेत असताना शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोलंदाज राहण्यास असलेल्या घराची भिंत अचानकपणे कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने पाचही जण जखमी झाले. तर घरातील टिव्ही, फ्रीज, कपाट व प्रापंचित साहित्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेस कारणीभूत नानासो वायदंडे यांच्यावर जमीर गोलंदाज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.