Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला असून लिंबु चौकात संस्थेची ९ वी शाखा लवकरच सुरु करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन मदन कारंडे यांनी सांगितले. श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासद प्रकाश धुमाळ उपस्थित होते.

कारंडे यांनी संस्थेचे २० हजार ६६९ सभासद असून अधिकृत भागभांडवल ८ कोटी आहे. वसूल भागभांडवल ६ कोटी ८० लाख आहे. संस्थेकडे १३८ कोटी ४९ लाखांच्या ठेवी असून १११ कोटी २४ लाख कर्ज वितरण केले आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २४९ कोटी ७३ लाख असून संस्थेचा राखीव, इतर निधी २० कोटी ९१ लाख आहे. अहवाल सालात संस्थेला ३ कोटी रुपये नफा झाला असून संस्थेचे खेळते भांडवल १७७ कोटी असल्याचे सांगून कर्जदारांनी नियमित आणि वेळेवर कर्जाचे हप्ते भरून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे सल्लागार संदीप जाधव, शीतल दत्तवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर यांनी नोटीस आणि विषयपत्रिकेचे वाचन केल्यावर सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेस व्हा. चेअरमन शिरीष कांबळे, संचालक गजानन कडोलकर, सुनील पाटील, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय घायतीडक, कलेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे, दिशा जाधव, बबिता माछरे, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, असि. जनरल मनेजर भारत गिड्डे यांच्यासह सल्लागार सदस्य, सभासद उपस्थित होते.