नवरत्न मंडळाचा १४० फूट झुलता पूल भाविकांचे लक्ष वेधतोय ; पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल
अर्जुनवाड / महान कार्य वृत्तसेवा (कृष्णात हेगाण्णा)
गणेशोत्सव म्हटला की भक्ती, उत्साह, सृजनशीलता आणि एकतेचा संगम ! दरवर्षी काहीतरी अनोखं सादर करण्याची परंपरा जपणाऱ्या अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथील नवरत्न कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने यंदा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा १४० फूट लांबीचा भव्य झुलता पूल साकारला आहे. हा पूल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर सीमाभागातील नागरिकांसाठीही एक रोमांचक अनुभव ठरणार आहे.
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणाईची अथक मेहनत आणि मंडळाची दूरदृष्टी या संयोगातून तयार झालेला हा झुलता पूल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आकर्षक रोषणाई आणि सजावट यामुळे पुलावरून चालताना खऱ्या झुलत्या पुलाचा थरार जाणवेल. दिवसभरातील गडबडी नंतर रात्री पुलावर फिरताना येणारा रोमांच भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहे.
गणेशोत्सव काळात दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पूल खुला असणार असून, सोबतच पौराणिक गुहा व शिवालयाचे दर्शन घेण्याचीही संधी भाविकांना मिळणार आहे. महिला व मुलींसाठी स्वतंत्र रांगेची सोय, तसेच शेजारच्या शाळेच्या क्रीडांगणावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने निर्धास्तपणे या अनोख्या अनुभवाचा आनंद घ्यावा, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
गणेशोत्सव २०२५ मध्ये फक्त झुलता पूलच नव्हे, तर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ गणेशपूजा व आरतीसोबतच भजन, कीर्तन, नृत्य, नाटक, बालवर्गीय व महिला स्पर्धा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान आणि व्यसनमुक्तीचे संदेश देणारे कार्यक्रम आयोजित केले जातील. भक्तीबरोबर समाजकारण व संस्कृतीचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवता येणार आहे.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील तसेच सीमाभागातील नागरिक, भाविक व पर्यटकांनी या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाचा गणेशोत्सव अर्जुनवाडकरांसाठी आणि जिल्ह्याच्या भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार यात शंका नाही. चला तर मग, कुटुंबासह या भव्य झुलत्या पुलाचा आनंद घ्या आणि गणेशभक्तीत रंगून जा !
रोमांचकता आणि उत्साहावर भर
नवरत्न कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने तब्बल १४० फूट लांबीचा झुलता पूल साकारला आहे. हा पूल कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मानला जात आहे. संध्याकाळी रोषणाईच्या झगमगाटात पुलावर चालताना मिळणारा थरार हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरणार आहे. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तरुणाईची सृजनशीलता या दोन्हींचा संगम या पूलातून दिसून येतो. या अनोख्या झुलत्या पुलामुळे अर्जुनवाड जिल्ह्यातील सर्वात चर्चेचे ठिकाण बनले आहे.
सामाजिक संदेश आणि भव्यतेवर भर
पुलावर चालताना येणारा थरार आणि रोषणाईने उजळलेला देखावा पर्यटकांना खिळवून ठेवतो. पण यंदाचा उत्सव केवळ पूलपुरता मर्यादित नाही. मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती संदेश, महिला व बालवर्गीय उपक्रम अशा विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या गणेशपूजा, आरती आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे.
