Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

कबड्डीचा गड म्हटलं की महाराष्ट्र पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या पर्वातही महाराष्ट्राची छाप ठसठशीत दिसणार आहे. या हंगामात राज्यातील तब्बल 32 खेळाडू उतरतील. हा आकडा मोठा आहे.  त्यातच दोन माजी विजेते संघ, यू मुम्बा आणि पुनेरी पलटन  पुन्हा एकदा मैदानात आमनेसामने येणार आहेत.

ऐतिहासिक लढतीची रंगत

18 सप्टेंबर रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियमवर यू मुम्बा विरुद्ध पुनेरी पलटनची ऐतिहासिक टक्कर होणार आहे. हाच तो मैदान जिथे 2024 मध्ये पीकेएल चा 1000वा सामना खेळला गेला होता. या सामन्यात यू मुम्बाचा कणखर कर्णधार सुनील कुमार आणि पलटनचा स्टार रेडर तसेच कर्णधार असलम इनामदार यांच्यात थरारक द्वंद्व पाहायला मिळणार आहे.

असलमचा अभिमान

जखमी होऊन पुनरागमन करणारा असलम म्हणाला ”महाराष्ट्रात जन्मलो, वाढलो याचा मला प्रचंड अभिमान आहे. पलटनला विजेते बनवणं हा माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण होता. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी खास आहे.”

सुनीलचा संकल्प

यू मुम्बाचा कर्णधार सुनील कुमार म्हणाला, ”महाराष्ट्र कबड्डीचा गड आहे. यू मुम्बासारख्या वारशासंपन्न संघाचं नेतृत्व करणं हा सन्मान आहे. या वेळी फक्त प्लेऑफ नव्हे, तर ट्रॉफी मुंबईत आणणं हेच आमचं ध्येय आहे.”

प्रशिक्षकांचा आत्मविश्वास

यू मुम्बाचे मुख्य प्रशिक्षक अनिल चाप्राना म्हणाले, ”खेळाडूंमध्ये शिस्त आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती रुजवणं हेच माझं ध्येय आहे. आम्ही चाहत्यांचा अभिमान वाढवू.” पलटनचे प्रशिक्षक आणि कबड्डीचा दिग्गज अजय ठाकूर म्हणाले, ”खेळाडूपासून प्रशिक्षक होणं हा माझ्यासाठी अभिमानाचा टप्पा आहे. महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व करणं ही जबाबदारी आहे. या नव्या पिढीकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्यावर भर असेल.”

लीग कमिशनरचं मत

पीकेएल चे बिझनेस हेड आणि कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले, ”महाराष्ट्र नेहमीच भारतीय कबड्डीचं केंद्रबिंदू राहिलं आहे. यंदा दोन दमदार संघ आणि 32 खेळाडूंमुळे राज्याची ताकद अधिक ठळकपणे दिसेल. चाहत्यांना जबरदस्त सामने पाहायला मिळणार आहेत.”

हंगामाची सुरुवात पीकेएल हंगाम 12 ची सुरुवात 29 ऑगस्टपासून होणार आहे. पहिल्याच दिवशी विशाखापट्टणममध्ये तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिळ थलैवास आणि बेंगळुरु बुल्स विरुद्ध पुनेरी पलटन असे दोन रोमांचक सामने रंगणार आहेत.