सातारा / महान कार्य वृत्तसेवा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी दुबार, तिबार मतदार नोंदणी आणि मतदान केलं असल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यावर रेठरे बुद्रुक परिसरात शर्मा, वर्मा कुठून आले? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर यांनी केला आहे. मत चोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच भाजपाकडून आमच्या कुटुंबावर आरोप केले जात असल्याचा पलटवार पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनीच व्होट चोरी केली – मतदार यादीमधील घोळ समोर आणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खळबळजनक आरोप केले. मात्र आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कुटुंबातील सदस्यांची दुबार, तिबार नावे असून पृथ्वीराज चव्हाण यांनीच 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुका मत चोरी करून जिंकल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
नऊ जणांची दुबार नावे – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं कराडच्या पाटण कॉलनीत निवासस्थान आहे. या पत्त्यावर मतदार यादीत 15 नावे आहेत. मात्र, त्यातील अनेकजण या ठिकाणी राहात नसल्याचा आरोप भाजपाचे कराड तालुका अध्यक्ष पै. धनाजी पाटील यांनी केला. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील 9 लोकांची दुबार नावं असून कराड दक्षिणसह पाटण विधानसभा मतदार संघातही त्यांची नावं असल्याचं ते म्हणाले.
मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच आरोप – मी आणि माझ्या कुटुंबानं एकाच ठिकाणी मतदान केलं असून भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचं पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना खंडन केलं. कराड दक्षिणमध्ये झालेली मतांची चोरी झाकण्यासाठीच भाजपाचे पदाधिकारी आरोप करत आहेत. दुबार नावाची नोंद आणि बोगस मतदान यामध्ये फरक आहे. माझ्या आणि कुटुंबातील लोकांच्या दुबार नावाबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता. तरीही नावे मतदार यादीतून वगळली गेली नाहीत. ही निवडणूक आयोगाचीच चूक असल्याचं त्यांनी सांगितलं. रेठरे परिसरात शर्मा, वर्मा कुठून आले? – प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर यांनीही भाजपाच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, रेठरे बुद्रुक परिसरात शर्मा, वर्मा अशा आडनावांच्या लोकांची नावं मतदार यादीत कशी आली? हा प्रश्न मीडियाने विचारला तर आमदार अतुल भोसले यांना सांगता येणार नाही. म्हणून आरोप करायला त्यांनी प्रवक्ते नेमले असल्याचा टोला चिखलीकर यांनी लगावला.
