गडचिरोली / महान कार्य वृत्तसेवा
बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. वास्तविक, गडचिरोतील एका आमदारानं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेजस्वी यादव यांच्या ‘एक्स’ पोस्ट मुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं तक्रारीत म्हटलं आहे.
बिहारमधील गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (22 ऑगस्ट) सभा होती. या सभेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफफॉर्मवर पोस्ट केली. त्यांच्या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून, गडचिरोलीतील भाजपा आमदारनं यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदाराच्या तक्रारीत काय? : भाजपाचे स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये आरोप करण्यात आले आहेत की, तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर, नरोटेंनी तेजस्वी यादव यांना अटक करण्याची मागणीही केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात दंगली होऊ शकतात आणि निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण उग्र होऊ शकते, अशी भूमिका भाजपानं घेतली आहे.
आमदार नरोटेंनी ट्विटरवरील संबंधित लिंकही पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या पोस्टचा सखोल तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि देशातील शांततेसाठी योग्य ती कारवाई करावी, असं आवाहन आमदार नरोटेंनी केलं आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय? : पंतप्रधान मोदी 22 ऑगस्ट रोजी बिहार दौऱ्यावर होते. या दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक कार्टून शेअर केलं. ज्यामध्ये पंतप्रधानांच्या गया रॅलीचं वर्णन ”जुमलों की दुकान” असं करण्यात आलं होतं. या ट्विटनंतर बिहारमधील भाजपा नेत्यांनीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
