Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

मुसळधार पावसाचा फटका मुंबईकरांसह पुणेकरांनाही बसला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये धो धो कोसळलेल्या पावसामुळे पाणी साचलं. नागरी वस्त्यांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं तर दुसरीकडे काही ठिकाणी वाहतुकीलाही फटका बसला आहे.

मुंबईप्रमाणं पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. जोरदार पावसामुळे खडकवासला, वरसगाव, पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलाय. धरणांतून पाणी सोडल्यानं मुळा आणि मुठा नद्या दुधडी भरुन वाहतायेत. पुण्याच्या नदीकाठचा परिसर जलमय झालाय. एकतानगर भागातल्या सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

पुण्यात खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीत विसर्ग वाढवला. 39 हजार क्युसेक वेगानं धरणातून पाणी सोडलंय. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय. मुसळधार पावसामुळे घोडनदी धोकादायक पातळीवरून वाहतेय. चांडोह लाखनगावातला पूल पाण्याखाली गेल्यानं शिरूर आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला. मात्र स्थिती कितीही भीषण असली तरी स्टटंबाज कधी ऐकतात का. असाच एक नमुना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पूल ओलांडताना दिसला.

पुण्यात मुळा-मुठा नदीला पूर आलाय. पुलाची वाडी परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं. पुणे मनपाच्या अधिका-यांनी परिस्थितीची पाहणी केली. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खो-यात मुसळधार पाऊस होतोय. चासकमान धरण तुडुंब भरून वाहतंय. धरणातून 24 हजार क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. दमदार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदीत होणा-या विसर्गात वाढ केली गेलीय. 91 हजार 600 विसर्ग होतोय. नीरा नदीपात्रात 54 हजार क्युसेक वेगानं विसर्ग केला गेलाय. त्यामुळे नीरा आणि भीमेच्या नरसिंहपुरातल्या संगमामधून पंढरपूराकडे पाण्याचा प्रवाह आता 1 लाख 45 हजार क्युसेक इतका झालाय. पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. थेरगाव बंधारा पूर्णपणे भरलाय. केजी मंदिर पाण्याखाली गेलंय. पुण्यातल्या तालुक्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झालीय. काही ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवनावरही परिणाम झालाय.