इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
येथील सुमेध दत्तगुरु पेंडुरकर यांना अमेरिकेतील टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयात वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.
सुमेध यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डी.के.टी.ई. इंग्लिश मीडियम स्कूल, इचलकरंजी येथे झाले. दहावीमध्ये असतानाच त्यांनी एनटीएस (National Talent Search) शिष्यवृत्ती मिळवली होती. तसेच ते राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाले होते.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) मध्ये प्रवेश घेतला. याच काळात COEP चा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला, त्या प्रकल्पात सुमेध यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. सुमेध पेंडुरकर यांच्या या यशामुळे इचलकरंजी शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
