Spread the love

दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रमवारीत तो नंबर वन गोलंदाज ठरला आहे. केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू असला तरी तो भारतीय वंशाचा आहे आणि हनुमानाचा निस्सीम भक्त आहे. सध्या तो वनडे क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 धावांत 5 बळी घेणारा केशव महाराज दोन वर्षांनी पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी तो 2023 मध्ये एकदिवसीय क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज बनला होता. या यादीत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनी वगळता, सर्व गोलंदाज फिरकी गोलंदाज आहेत. श्रीलंकेचा महेश तीक्ष्णा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसीने आज म्हणजेच 20 ऑगस्टला नवी क्रमवारी जाहीर केली आहे.

भारताचे गोलंदाज वनडे क्रमवारीत कितव्या स्थानी?

केशव महाराज गोलंदाजीत दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. त्यांनी श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश तीक्ष्णाला मागे टाकलं. एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच 5 बळी घेणाऱ्या केशव महाराजचे रेटिंग गुण 687 आहेत. तीक्ष्णा 671 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत दोन भारतीय गोलंदाजांचाही समावेश आहे. कुलदीप यादव 650 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा (616) नवव्या स्थानावर आहे.

नामिबियाचा फिरकी गोलंदाज बर्नार्ड स्कोल्झ या यादीत चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज पाचव्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सॅटनर सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ॲडम झाम्पा दहाव्या स्थानावर आहे. टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अनुक्रमे 13 व्या, 14 व्या आणि 15 व्या स्थानावर आहेत.

वनडे क्रमवारीतून विराट कोहली रोहित शर्माचं नाव केलं गायब

वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं नाव काढून टाकण्यात आल्याचं दिसलं आहे. रोहित शर्मा काही दिवसांपूर्वी या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आणि विराट कोहली चौथ्या स्थानी होता. पण रोहित विराटचं नाव नसलेला क्रमवारीचा फोटो क्षणात व्हायरल झाला. त्यामुळे रोहित विराट वनडेमधूनही निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली, पण आयसीसीने काही वेळात ही चूक दुरूस्त करत पुन्हा त्यांची नाव लिहिली.

कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहचं पहिल्या स्थानी

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅट हेनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप-10 मध्ये 5 ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहेत. न्यूझीलंडचा जेकब डफी टी-20 मध्ये नंबर-1 गोलंदाज बनला आहे. इंग्लंडचा आदिल रशीद दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा वरुण चक्रवर्ती चौथ्या स्थानावर, रवी बिश्नोई 7 व्या स्थानावर आणि अर्शदीप सिंग 10 व्या स्थानावर आहे. या यादीतही, एकही पाकिस्तानी गोलंदाज टॉप-10 मध्ये नाही.